महेंद्रसिंह धोनीची टीम इंडियामध्ये निवड कशी झाली? माजी निवड अधिकाऱ्याचा खुलासा

'धोनीला संघाकडून खेळण्याची संधी द्या', सौरव गांगुलीला 10 दिवस माजी निवड अधिकाऱ्यानी केली होती विनंती

Updated: Jun 2, 2021, 01:33 PM IST
महेंद्रसिंह धोनीची टीम इंडियामध्ये निवड कशी झाली? माजी निवड अधिकाऱ्याचा खुलासा title=

मुंबई: महेंद्रसिंह धोनीचे चाहते जगभरात आहेत. विकेटकीपर, फलंदाज आणि उत्तम कर्णधार म्हणून जगभरात धोनीची चर्चा आहे. महेंद्रसिंह धोनीची टीम इंडियामध्ये निवड कशी झाली याचा एक किस्सा माजी निवड समितीमधील एका अधिकाऱ्याने सांगितला आहे. 

महेंद्रसिंह धोनीची टीम इंडियामध्ये निवड होण्यापूर्वी त्याने आपल्या फलंदाजीने कमाल करून दाखवली होती. त्यावेळी टीम इंडियाला उत्तम विकेटकीपर आणि फलंदाजाची गरज होती. धोनीने ज्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं त्यावेळी दिनेश कार्तिक, पार्थिव पटेल, अजय रात्रा यांसारखे विकेटकीपर देखील होते. मात्र महेंद्रसिंह धोनीने आपल्या कामगिरीनं टीम इंडियामधील आपली जागा निश्चित केली. 

धोनीची टीम इंडियामध्ये निवड कशी झाली याचा खास किस्सा माजी निवड अधिकाऱ्याने सांगितला आहे. माजी निवड अधिकारी किरण मोरे यांनी सांगितलं की, 'धोनीला मी शोधलं होतं. त्यावेळी संघात त्याला घ्यावं यासाठी जवळपास सलग 10 दिवस मी सौरव गांगुलीला विनंती केली.'

एका युट्युब मुलाखतीदरम्यान किरण मोरे यांनी खुलासा केला आहे. 'आम्हाला एका चांगल्या विकेटकीपरची गरज होती. जो आक्रमक फलंदाजी करू शकेल आणि उत्तम विकेटकीपिंग देखील. त्यावेळी राहुल द्रविड वन डेमध्ये विकेटकीपरची भूमिका निभावत होते.' 

'2004मध्ये दिलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात धोनीने खेळावं अशी माझी इच्छा होती. त्यावरून सौरव गांगुली, दीपदास गुप्ता यांच्यासोबत माझा थोडा वाद देखील झाला होता. सौरव गांगुलीला मी 10 दिवस समजवत होतो. त्याला विनंती केली आणि त्यानंतर धोनीला खेळवण्यात आलं' असा दावा किरण मोरे यांनी केला आहे.