केरळमध्ये एका 24 वर्षीय तरुणीला कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. तरुणीने दोन वर्षांपूर्वी आपल्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या केली होती. ग्रीष्मा असं या तरुणीचं नाव आहे. नात्यातून सुटका करण्यासाठी तिने आपला 23 वर्षीय प्रियकर शरॉन राज याची विष पाजून हत्या केली होती.
गेल्या आठवड्यात ग्रीष्मा आणि तिच्या काकाला हत्येसाठी दोषी ठरवणाऱ्या स्थानिक न्यायालयाने गुन्ह्याच्या गांभीर्यापेक्षा आरोपीचे वय विचारात घेण्याची गरज नाही असं निरीक्षण नोंदवलं. आरोपीने तिच्या शैक्षणिक कामगिरी, पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास नसणे आणि ती तिच्या पालकांची एकुलती एक मुलगी आहे हे कारण देत शिक्षेत सौम्यता मागितली होती.
गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी वकिलांनी परिस्थितीजन्य, डिजिटल आणि वैज्ञानिक पुराव्यांवर अवलंबून असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. केरळमध्ये फाशीची शिक्षा भोगणारी ग्रीष्मा ही सर्वात तरुण महिला ठरली आहे. पीडितेच्या वकिलाने निकालानंतर न्यायालय पुरावे स्वीकारेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
"मी कोर्टासमोर युक्तिवदा करत असताना, कोर्ट आम्ही दिलेले पुरावे स्विकारेल असा विश्वास होता. हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्याचा युक्तिवाद मी केला. तसंच याप्रकरणी फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती. हा आदर्श निर्णय आहे," असं विशेष सरकारी वकील व्ही एस विनीत कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
2022 मध्ये ग्रीष्माने प्रियकराला पॅराक्वॅट या तणनाशकाने बनलेले आयुर्वेदिक टॉनिक देऊन विषप्रयोग केला होता. 11 दिवसांनी सर्व अवयव निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाल होता. तामिळनाडूमधील एका लष्कर जवानाशी लग्न ठरल्यानंतरही राज नातं संपवण्यास तयार नसल्याने ग्रीष्माने हत्येचा कट आखला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रीष्माने याआधी पळांच्या ज्यूसमध्ये पॅरासिटोमॉल टॅब्लेट मिसळून राजची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण चव खराब असल्याचं सांगत त्याने पिण्यास नकार दिला होता.
तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील पारासला येथील रहिवासी असलेला राज हा बीएससी रेडिओलॉजीचा विद्यार्थी होता. ग्रीष्माला भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांखाली दोषी ठरवण्यात आले, ज्यामध्ये खून देखील समाविष्ट आहे. तिचे काका निर्मलाकुमारन नायर यांना पुरावे नष्ट केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. आरोपीच्या आईलाही ताब्यात घेण्यात आले होते, परंतु पुराव्याअभावी तिला निर्दोष सोडण्यात आलं.