Republic day 2025 chief guest indonesias president prabowo subianto: गेल्या वर्षी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर 2023 मध्ये मिस्रचे राष्ट्रपती अब्देल फतह अल-सिसी यांनी हा मान स्वीकारला होता. 1950 पासून भारतात प्रजासत्ताक दिनासाठी मुख्य अतिथी आमंत्रित करण्याची परंपरा सुरू झाली. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यंदा भारताच्या प्रजासत्ताक दिनच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. महत्त्वाची बाब म्हाणजे तिसऱ्यांदा इंडोनेशियाचे राष्टपती प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून येतील. याआगोदर 26 जानेवारी 1950 रोजी इंडोनेशियाचेच राष्ट्रपती सुकर्णो हे भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे पहिले प्रमुख पाहुणे होते. त्यानंतर 2011 मध्ये पुन्हा इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुसिलो बामबांग युधयोनो हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते.
कुठल्याही परदेशी नेत्याला भारताचा प्रमुख अतिथी बनवणे हे त्यांच्यासाठी सर्वोच्च सन्मान मानले जाते. प्रमुख पाहुणे प्रजासत्ताक दिनच्या संपूर्ण कार्यक्रमांना उपस्थित राहतात. त्यांच्या सन्मानार्थ 21 तोफांची सलामी दिली जाते. राष्ट्रपती भवनात त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जातो. त्यांच्या सन्मानार्थ भारताचे राष्ट्रपती विशेष स्वागत समारंभ आयोजित करतात.
त्याशिवाय, पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती यांच्यासह भारतातील प्रमुख नेते त्यांच्यासोबत संवाद साधतात. त्यामुळे मुख्य अतिथीला दिला जाणारा सन्मान अत्यंत विशेष मानला जातो. या सन्मानासाठी पात्र पाहुणे निवडण्यासाठी एक सखोल प्रक्रिया पार पडते.
प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे निवडण्याची प्रक्रिया सहा महिन्याआधी सुरू होते. यासाठी काही महत्त्वाच्या बाबी विचारात घेतल्या जातात. प्रमुख अतिथी निवडताना भारत आणि त्या देशामधील राजकीय, आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रातील संबंधांचा अभ्यास केला जातो. त्या देशासोबत भारताचे जुने संबंध कसे आहेत? या पुढे या भेटीचा काय फायदा होऊ शकतो? याचाही विचार केला जातो. या प्रक्रियेवर अंतिम शिक्कामोर्तब परराष्ट्र मंत्रालय करते.
इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांचा भारत दौरा अनेक कारणांनी महत्त्वाचा मानला जात आहे. हा मान इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींना देण्याचं विशेष कारण म्हणजे 'ब्रह्मोस क्षेपणास्त्र'. भारत आणि इंडोनेशिया यांच्यात ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदीबाबतचा 450 मिलियन डॉलरचा करार या दौऱ्यात अंतिम होण्याची शक्यता आहे. काही रिपोर्ट्सनुसार, इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या खरेदीसाठी भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आहे. भारतीय स्टेट बँक इंडोनेशियाला कर्ज देण्याची शक्यता आहे. ही सगळी प्रक्रिया आत्ता शेवटच्या टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर, सुबियांतो यांचा दौरा भारत आणि इंडोनेशियासाठी नवे आर्थिक व संरक्षणीय सहकार्य मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.