IPL 2024: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) अखेर सलग चार पराभवानंतर सनरायजर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) मात करत आयपीएलमधील (IPL) आव्हान कायम ठेवलं आहे. याचं कारण मुंबई इंडियन्सला अद्यापही प्ले-ऑफसाठी पात्र होण्याची संधी आहे. पण मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मात्र या मताशी सहमत नाही आहे. सामन्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज संजय मांजरेकरने हार्दिकला यासंबंधी प्रश्न विचारला असता त्याने आश्चर्य व्यक्त केलं. तुम्ही नेमकं कोणतं गणित मांडत आहात हे मला समजलं नसल्याचं हार्दिक म्हणाला.
"तुम्ही नेमकं कोणतं गणित मांडत आहात हे मला समजलेलं नाही. पण याचवेळी आमचं लक्ष चांगलं क्रिकेट खेळण्यावर आहे," असं हार्दिक पांड्या सामन्यानंतर म्हणाला. दरम्यान मुंबई इंडियन्सचा मागील पाच सामन्यातील हा पहिला विजय ठरला. हैदराबादविरोधातील विजयामुळे मुंबई इंडियन्स संघाला गुणतालिकेत थोडं वरती येत आपली लाज वाचवता आली आहे.
मुंबई इंडियन्स संघ सध्या 8 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्ससह गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किग्स यांचेही 8 गुण आहेत. या सर्व संघांनी मुंबईपेक्षा 1 सामना कमी खेळला आहे. यानंतर दिल्लीचे 10 तर चेन्नई, हैदराबाद आणि लखनऊचे 12 गुण आहेत.
मुंबई इंडियन्स संघाची या 7 संघांसह स्पर्धा आहे. या संघांचे निकाल मुंबई इंडियन्सचं भवितव्य ठरवतील. कोलकाता आणि राजस्थान रॉयल्स 16 गुणासंह आधीच प्लेऑफमध्ये दाखल झाले आहेत.
मुंबईचे कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुप जायंट्स विरुद्ध दोन सामने बाकी आहेत. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना प्रथम दोन्ही सामने जिंकावे लागतील. पण यानंतरही काम फक्ते होणार नाही. कारण त्यांना स्पर्धेत पुढे जाण्यासाठी इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.
कोलकाता आणि राजस्थान संघ गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असून प्रचंड फॉर्मात आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्ससमोर कडवं आव्हान असेल. यादरम्यान हैदराबाद आणि लखनऊमधील निर्णयदेखील मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण पराभूत संघाला उर्वरित सर्व सामनेही गमवावे लागतील. यासह तो संघ 12 गुणांवर राहील.
यासह जे संघ सध्या अखेरच्या चारमध्ये आहेत त्यांचे 12 पेक्षा जास्त गुण न होणं मुंबईसाठी महत्वाचं आहे. तथापि, हे सर्व केल्यानंतरही, हार्दिक आणि संघाल स्पर्धेत पुढे जाण्यासाठी 12 गुणांवर इतर संघांच्या नेट रन रेटवरही अवलंबून राहावे लागेल.