हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा ४ धावांनी निसटता पराभव झाला. भारताला विजयासाठी अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी १६ धावांची गरज होती. पण खेळपट्टीवर असलेल्या कृणाल पांडया आणि दिनेश कार्तिक या जोडीला ११ धावाच करता आल्या.
हा सामना दिनेश कार्तिकच्या चुकीमुळे गमावला, अशा प्रतिकिया नाराज क्रिकेटप्रेमींकडून व्यक्त केल्या जात आहेत. अखेरच्या ओव्हरमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर दिनेश कार्तिकने एकही धाव घेतली नाही. कार्तिकने अखेरच्या बॉलवर सिक्स लगावला. पण तेव्हापर्यंत सामना भारताच्या हातून निसटला होता.
— रति शंकर शुक्ल (@rati_sankar) February 10, 2019
दिनेश कार्तिकच्या या चुकीमुळे क्रिकेट चाहत्यांनी समाज माध्यमांवर राळ उडवली आहे. पण पराभवासाठी सर्वस्वी दिनेश कार्तिकला कारणीभूत ठरवू शकत नाही. धोनीचा अपवाद वगळला, तर तिसऱ्या सामन्यात फलंदाजांनी चांगली खेळी केली. पण कोणालाच अखेर पर्यंत टिकून राहून भारताला विजय मिळवून देता आला नाही.
सलामीवीरांनी निराशा केली
निर्णायक सामन्यात न्यूझीलंडने भारताला विजयासाठी २१३ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करायला आलेल्या रोहित-शिखर या जोडीला भारताच्या डावाला चांगली सुरुवात देता आली नाही. भारताने पहिली विकेट ६ धावांवर गमावली. रोहित शर्माने ३८ धावांची खेळी तर केली, पण त्याला आपल्या खेळीने भारताला विजयापर्यंत पोहचवता आले नाही. धोनीला या सामन्यात आपल्या बॅटिंगने विशेष असे करता आले नाही. धोनी अवघ्या २ धावा करुन बाद झाला. शिखर धवन, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी या तिघांनी फक्त ४५ धावा केल्या.
भारताच्या उर्वरित ५ फलंदाजांनी चांगला खेळ केला. या ५ फलंदाजांमध्ये विजय शंकर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्य़ा, कृणाल पांड्या आणि दिनेश कार्तिक यांचा समावेश आहे. या पाचही जणांनी ८० बॉलमध्ये १५१ धावा केल्या. यात २२ चौकारांचा समावेश होता.
विजय शंकरने २८ बॉलमध्ये ४३ धावा केल्या. पंतने १२ बॉलचा सामना करत २८ धावांची तडाखेबाज खेळी केली. हार्दिक पांड्याने ११ बॉल खेळून २१ धावा केल्या. कृणाल पांड्या आणि दिनेश कार्तिक ही जोडी शेवटापर्यंत मैदानात होती. कृणाल पांड्याने २६ तर दिनेश कार्तिकने ३३ धावांची खेळी केली.