www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ‘प्रहार’ केलाय. राज ठाकरे नाशिकमध्ये काय केलं, असा सवाल राणे यांनी विचारला आहे.
ठाणे येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ‘व्हिजन – २०१४’ मेळाव्यात नारायण राणे बोलत होते. राज ठाकरेही म्हणत होते माझ्या हातात सत्ता द्या! मी विकास करून दाखवतो. नाशिकची सत्ता दिली काय केलेत, असा प्रश्न राज यांना राणे यांनी यावेळी विचारला.
सज्ज राहा
देशाला सुजलाम, सुफलाम करण्याची ताकद केवळ काँग्रेस पक्षातच आहे. गोरगरिबांच्या विकासासंबंधी अनेक योजना काँग्रेसने राबवल्या आहेत. त्या सर्व योजना गावागावांत पोहोचवा, विरोधकांच्या टीकेला तिथल्या तिथे उत्तर देऊन २०१४ च्या निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहनही राणे यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
युतीला फटकारले
यावेळी शिवसेना आणि भाजप युतीलाही त्यांनी फटकारले. ज्यांना मुंबई-ठाणे सांभाळता येत नाही. ते राज्य सांभाळण्याची स्वप्ने पाहत आहेत, असा टोलाही राणे यांनी या वेळी लगावला. मुंबई आणि ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजपला सत्ता देऊन पाहिली. काय विकास केला त्यांनी, मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे. त्याची काय अवस्था केली. एक तरी समस्या सोडवली का? रस्ते, पर्यावरणासारखे प्रश्नही त्यांना सोडवता आले नाहीत. हे काय मुंबईचे शांघाय करणार?
नरेंद्र मोदी थापाडे
विकासात गुजरात महाराष्ट्राची कधीही बरोबरी करू शकत नाही. कोणत्याही क्षेत्रात नाही. मात्र विकासाच्या खोट्या थापा मारून नरेंद्र मोदी विकासाचे चित्र निर्माण करत आहेत. त्यांच्यासारखा थापाड्या माणूस मी राजकारणात अद्याप पाहिलेला नाही, असा घणाघाती हल्ला राणे यांनी मोदींवर केला.
भाजपमध्ये गोंधळ आहे. लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, नरेंद्र मोदी यांच्यात आतापासूनच पंतप्रधानपदासाठी भांडणे सुरू आहेत. गोपीनाथ मुंडेंचे नाव अद्याप आलेले नाही. नवरी मांडवात नाही, हे मुंडावळय़ा बांधून तयार आहेत. ते आपसात भांडतायेत. त्यांना खुशाल भांडू द्या. ते आपल्या फायद्याचे आहे, असे राणे म्हणालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.