USA Action Against Bangladesh: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यापासून अमेरिकेतली घडामोडींना वेग आला आहे. अमेरिकेतली अनेक अंतर्गत विषयांबरोबरच ट्रम्प यांनी अंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. याच निर्णयांमध्ये अमेरिकेने बांगलादेशला दिली जाणारी आर्थिक मदत बंद करण्याचाही निर्णय घेतला आहे. बांगलादेशला दिला जाणारा आर्थिक सहाय्य निधी आम्ही बंद करत आहोत, असं अमेरिकेने जाहीर केलं आहे. या निर्णयामुळे मोहम्मद यूनूस यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकारसमोरील आर्थिक अडचणी अधिक वाढल्या असून भारताचा हा शेजारी देश पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक संकटात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमेरिकन अंतरराष्ट्रीय विकास संस्था म्हणजेच युएसएआयडीने शनिवारी एक अधिसूचना जारी करत बांगलादेशला दणका दिला. बांगलादेशबरोबर केलेले सर्व आर्थिक करार आणि प्रकल्पांसंदर्भातील निर्णय मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. तातडीने या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करत त्यांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. त्यामध्येच या आदेशांचा समावेश आहे.
मागील 50 वर्षांपासून अमेरिकेने बांगलादेशला सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, ऊर्जा, पर्यावरण, खाद्य सुरक्षा आणि नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या कारणांसाठी जवळपास 800 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 68 हजार कोटी रुपयांचा मदतनिधी दिला आहे. मात्र 24 जानेवारी रोजी ट्रम्प प्रशासनाने इस्रायल आणि इजिप्त वगळता सर्व देशांना दिला जाणारा मदतनिधी रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा फटका बांगलादेशलाही बसला आहे.
ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामध्ये बांगलादेशमध्ये अमेरिकेच्या आर्थिक मदतीने काम करणाऱ्या अनेक बिगरसरकारी संस्थांना मोठा फटका बसणार आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे बांगलादेशमधील अनेक प्रकल्पांनाही फटका बसणार असून हे प्रकल्प बंद पडू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना देश सोडून पळून गेल्या. त्यानंतर नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन करण्यात आलं. मात्र यानंतरही देशामधील अस्थिरतेची परिस्थिती आणि अल्पसंख्यांकांवर हल्ले होत असल्याच्या बातम्या वेळोवेळी पुढे आल्या आहेत. खरं तर ट्रम्प आणि युनूस यांच्यामध्ये आधीपासूनच तणावपूर्ण संबंध आहेत. अमेरिकेच्या या निर्णयामुळे युनूस यांचं टेश्नन वाढलं आहे. 'अमेरिका फर्स्ट' धोरणाअंतर्गत अमेरिकेने बांगलादेशला दिला जाणारा मदत निधी बंद करण्याचं ठरवलं आहे.