Corona Virus China : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा विराजमान झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या या निर्णयांचं सर्वच स्तरांतून स्वागत झालं असं नाही. पण, काही निर्णयांची दखल मात्र गादतिक स्तरावर घेण्यात आली. किंबहुना त्यांच्या या निर्णयांचे परिणामही जागतिक स्तरावर दिसून आले. ट्रम्प यांच्या या नव्या कारकिर्दीच्या सुरुवातीला आता आणखी एका गोष्टीचा उलगडा झाला असून, अमेरिकेतील सरकारी गुप्तचर यंत्रणा सीआयएनं एका महत्त्वाच्या गोष्टीचे पुरावे देत चीनकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
गुप्तचर संस्था सीआयएनं केलेल्या दाव्यानुसार साऱ्या जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूची उत्पत्ती ही नैसर्गिक नसून हा विषाणू प्रयोगशाळेतून लीक झाल्याचा मोठा दावा केला. मुळात ट्रम्प यांनी यापूर्वीच्या कार्यकाळातही कोरोना हा 'चिनी विषाणू' असल्याचं संबोधत शी जिनपिंग सरकारवर गंभीर आरोप केले होते. ज्यानंतर आता पुन्हा एकदा अमेरिकेनं चीनला कोरोनाच्या संसर्गासाठी दोषी ठरवल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, लाखोंच्या संख्येनं झालेले मृत्यू, लॉकडाऊन, जागतिक आर्थिक संकट यासाठी जबाबदार असलेल्या या विषाणूच्या उत्पत्तीचा प्रश्न जागतिक स्तरावर अतिशय महत्त्वाचा असून, अमेरिकेचा हा अहवाल राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचं स्पष्टीकरण चीनच्या वतीनं देण्यात आलं आहे.
सीआयएनं दाव्यात म्हटल्यानुसार कोरोनाचा विषाणू नैसर्गिकरित्या निर्मित झाला नसून, त्याची निर्मिती प्रयोगशाळेत निर्माण झाली असल्याचं यंत्रणेनं सांगितलं. कोरोना विषाणू प्रयोगशाळेतून उद्भवण्याची शक्यता नैसर्गिक नसून तो जाणीवपूर्वकरित्या प्रयोगशाळेत तयार करण्यात आला असल्याचा दावा सीआयएनं केला. पण, या दाव्यांवर कोणतेही पुरावे मात्र सादर करण्यात आलेले नाहीत. कोरोना विषाणू चीनमधील प्रयोगशाळेतून चुकून बाहेर पडला किंवा नैसर्गिकरित्या उदयास आला याबाबत चिनी अधिकाऱ्यांकडून मात्र सहकार्य करत नसल्यामुळं काही प्रश्न अनुत्तरितच राहतील असंही गुप्तचर विभागाने स्पष्ट केलं आहे.
बायडेन सरकार आणि सीआयएचे माजी संचालक विल्यम बर्न्स यांच्या विनंतीवरून हा अहवाल तयार करण्यात आला होता. ज्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी नियुक्त केलेले सीआयए संचालक जॉन रॅटक्लिफ यांच्या विनंतीवरून हा अहवाल सार्वजनिक करण्यात आला.