Saif Ali Khan Attack: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला होता. 6 दिवसांच्या उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. मात्र सैफ अली खानच्या हल्ला प्रकरणामुळं एका युवकाची नोकरी तर गेलीच पण त्याचं आयुष्यदेखील उद्ध्वस्त झालं आहे. सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं होतं. मात्र त्यानंतर त्याच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या दुसऱ्यादिवशीच त्याची नोकरी गेली आणि त्याचं लग्नदेखील तुटलं. त्याचं संपूर्ण कुटुंबाला अपमान सहन करावा लागतो.
मुंबई पोलिसांच्या सूचनेनुसार 18 जानेवारी रोजी छत्तीसगढच्या दुर्ग रेल्वे स्थानकावर पोलिसांनी 31 वर्षीय आकाश कनौजियाला अटक केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोपी शरीफुल मोहम्मदला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यामुळं आरपीएफने आकाशची सुटका केली. आकाशच्या ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्याने पुढे म्हटलं की, माझ्या घरच्यांना मोठा धक्का बसला त्यांच्या डोळ्यात पाणी होते. मीडियाने माझे फोटो छापण्यास सुरुवात केली आणी मी संशयित आहे, असं सांगितले. पण मुंबई पोलिसांच्या एका चुकीमुळं माझं आयुष्य बर्बाद झालं. त्यांनी एका गोष्टीकडे दुर्लक्ष केले की सैफच्या बिल्डिंगमध्ये घुसलेल्या आरोपीला मिशी होती. माझा चेहरा वेगळा होता.
आकाशने दावा केला आहे की, या घटनेनंतर पोलिसांनी मला फोन केला आणि विचारलं की कुठे आहेत. तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी घरी आहे आणि त्यांनी फोन कट केला. मी तेव्हा माझ्या होणाऱ्या बायकोला भेटायला जात होतो. तेव्हा दुर्गमध्ये मला ताब्यात घेण्यात आलं आणि पुन्हा रायपूरला आणण्यात आलं. तिथे मुंबई पोलिसांच्या पथकाने माझ्यासोबत मारहाणदेखील केली.
कनौजियाने पुढे म्हटलं आहे की, माझी सुटका झाल्यानंतर मी घरी गेलो. तेव्हापासून माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. दुसऱ्या दिवशी मला फोन आला आणि कामावर येऊ नको असं सांगण्यात आलं. त्यांनी माझं काहीही बोलणं एकून घेण्यास नकार दिला. इतकंच नाही तर, माझ्या होणाऱ्या बायकोनेही लग्नाला नकार दिला आहे. मला अटक करण्यात आल्यानंतर माझं लग्नही मोडलं आहे.
माझ्यावर कफ परेडमध्ये दोन आणि गुरुग्राममध्ये गुन्हे दाखल आहेत. मात्र त्याचा असा अर्थ नाही की मला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात यावं. मी आता सैफ अली खानच्या घराबाहेर उभं राहून नोकरी मागण्याचा विचार करत आहेत. कारण त्याच्यासोबत जे झालं त्यामुळं मला सगळं काही गमवावं लागलं.