योगेश खरे, www.24taas.com,नाशिक
नाशिकमध्ये युती तुटणार की काय, अशी चिन्हं दिसू लागली आहेत. नेत्यांचे आदेश येऊनही युतीची एकही बैठक झालेली नाही. आधी आक्रमक असलेले भाजप नेते आता मवाळ झालेत तर शिवसेना मात्र भाजपला झुलवत ठेवत आहे.
महापालिका निवडणूका महिन्यावर येऊन ठेपल्या तरी सेना-भाजप युतीमधली धुसफूस संपण्याची चिन्हं नाहीत. दोन्ही पक्षांची एकही बैठक झालेली नाही. भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी तर स्वबळासाठी आधीपासूनच आग्रही होते. ठोस विकासकामं झाली नसल्याचा आरोप करत सावजींनी सेनेविरोधातच बंद पुकारला होता. पण युतीचे आदेश राज्यस्तरावरुन आल्यानं आता भाजपची भाषा मवाळ झाली आहे.
दुसरीकडे शिवसेनेनं मात्र भाजपला झुलवत ठेवण्याची भूमिका कायम ठेवली आहे. एकीकडे आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे आणि दुसरीकडे युतीचे नेते जागावाटपांसाठी बैठकांचं नावही घेत नाहीत. हा उशीर युतीला नक्कीच महागात पडू शकतो.