ऑडिट : पृथ्वीराज चव्हाण यांचं राजकीय भवितव्य पणाला

कराड दक्षिण मतदारसंघातल्या लढतीकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. कारण या मतदारसंघात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं राजकीय भवितव्य पणाला लागलंय. 

Updated: Oct 8, 2014, 01:27 PM IST
ऑडिट : पृथ्वीराज चव्हाण यांचं राजकीय भवितव्य पणाला title=

सातारा : कराड दक्षिण मतदारसंघातल्या लढतीकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. कारण या मतदारसंघात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं राजकीय भवितव्य पणाला लागलंय. 

सातारा जिल्ह्यातला कराड दक्षिण मतदारसंघ. काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला. याआधी कधीही काँग्रेस उमेदवाराचा या मतदारसंघातून पराभव झालेला नाही. गेल्या ३५ वर्षांपासून सातत्यानं काँग्रेसकडून विलासकाका उंडाळकर निवडून येतायत. मात्र यंदा काँग्रेसनं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना कराड दक्षिण मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. 

विलासकाका उंडाळकर अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत. विलासकाका उंडाळकरांची ग्रामीण भागात चांगली पकड आहे. त्यामुळं पृथ्वीबाबांना खरं आव्हान असणार आहे ते विलासकाकांचंच. ग्रामीण भागात पृथ्वीराज चव्हाणांचा प्रभाव कमी असल्यामुळे त्यांनी त्याठिकाणी विशेष लक्ष केंद्रित केलंय. स्वच्छ प्रतिमा आणि कराडमध्ये केलेल्या विकासकामांच्या जोरावर आपणच विजयी होऊ असा विश्वास पृथ्वीराज चव्हाणांना आहे.

पूर्वाश्रमी काँग्रेसमध्ये असणारे डॉ. अतुल भोसले यावेळी भाजपच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात आपलं नशीब आजमावतायत. डॉ. अतुल भोसलेंनी शहरी मतदारसंघाबरोबर ग्रामीण भागातही आपली संपर्क यंत्रणा चांगल्याप्रकारे राबवत मुख्यमंत्र्यांसमोर मोठं आव्हान निर्माण केलंय. तर शिवसेनेकडून डॉ. अजिंक्य डी. पाटील रिंगणात आहेत. 

पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं अपक्ष विलासकाका उंडाळकरांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे याठिकाणी चांगलीच रंगत निर्माण झालीय. येत्या १९ ऑक्टोबरला इथं कोण बाजी मारतं, याकडं मुंबईपासून अगदी दिल्लीचंही लक्ष असणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.