नितीश स्तुतीवरून `मोहन` वादळ

गुजरातच्या मोदी सरकारपेक्षा बिहारमधील नितीशकुमार यांचं सरकार उत्तम असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलयं. त्यांच्या या वक्तव्यामुळं संघ परिवारात एकच वादळ निर्माण झालयं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 11, 2012, 02:22 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
गुजरातच्या मोदी सरकारपेक्षा बिहारमधील नितीशकुमार यांचं सरकार उत्तम असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलयं. त्यांच्या या वक्तव्यामुळं संघ परिवारात एकच वादळ निर्माण झालयं.
देशातल्या सर्वोत्तम सरकारांमध्ये बिहार अग्रस्थानी असल्याचं भागवत यांनी म्हटलयं. नरेंद्र मोदी हे संघाचे जुने स्वयंसेवक आहेत. ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असले तरी रालोआमधून त्यांच्या नावाला विरोध असून या शर्यतीत नितीशकुमार आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर संघानेच मोदींच्या तुलनेत नितीशकुमारांना सरस ठरवल्यामुळे संघ परिवारात एकच खळबळ उडालीय.
मात्र संघाचे प्रवक्ते मनमोहन वैद्य यांनी मात्र भागवत यांच्या वक्तव्याचा इन्कार केला असून भागवतांच्या वक्तव्याबाबत मिडीयामध्ये येणाऱ्या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलंय.
सध्या एनडीएत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी प्रमुख दावेदार मानले जातायेत. तर त्यांना नितीशकुमारांचा विरोध आहे. अशातच सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्यानं संघाची पसंती नितीशकुमारांना आहे का ? अशी चर्चा रंगू लागलीय.
लालकृष्ण अडवाणींच्या ब्लॉग प्रकरणानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे. याबाबत प्रतिक्रिया देण्यास सरसंघचालक मोहन भागवत यांनी नकार दिला असला, तरी या निमित्तानं त्यांनी भाजप नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहे.
पक्षातील वर्चस्वाची लढाई पक्षाला मारक असल्याचं त्यांनी म्हटलय. भाजपकडून कुणी विचारणा केल्यास अडवाणींच्या ब्लॉगबाबत प्रतिक्रिया देणार असल्याचंही त्यांनी म्हटलय.