www.24taas.com, झी मीडिया, रायगड
काँग्रेस आघाडीतले मंत्री हे नुसतेच गब्बर नाहीत, तर योजनाबद्धरित्या यांनी महाराष्ट्रातल्या आणि कोकणातल्या जमिनी मोठ्या प्रमाणावर लाटल्या आहेत. त्या जमिनी लाटताना योजना आखून पद्धतशीरपणे लाटल्या आहेत. आधी स्वतःसाठी जमिनी शोधतात त्या विकत घेतात आणि नंतर सरकारी तिजोरीतून त्या जागेवर प्रकल्प मंजूर करून विकासाचा सोंग आणतात, अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी महाड इथल्या सभेत केली आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार रमेश कदम यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत राज ठाकरे बोलत होते.
तर दुसरीकडे मावळ मतदार संघातील शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी शनिवारी खांदेश्वर इथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र रात्रीचे दहा वाजून गेल्यानंतर ही सभा सुरु होती. राज ठाकरे हे देखील सव्वा दहाला भाषण देण्यास उभे राहिले.
सरकारनं बनवलेल्या रस्त्यामुळं सभेसाठी पोहोचयला उशीर झाला, असं सांगत सरकारच्या कामावर हल्लाबोल केला. दरम्यान याप्रकरणी निवडणूक आयोगाच्या पथकानं भाषणाचं रेकोर्डिंग मागवलं, कारण राज ठाकरेंनी रात्री १० नंतर भाषणाला सुरूवात केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.