अगं अगं म्हशी, 'समृद्धी' देशी !

'समृध्द फुड्स'कडून शेतकऱ्यांसाठी ‘किसान योजने'च्या माध्यमातून केवळ चाळीसगांवमध्ये ५ हजार म्हशींचं वाटप करण्यात येणार आहे. शेती परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेला उदंड प्रतिसाद दिलाय. तसेच शेतकऱ्यांना शेणखतही सहजा सहजी मिळणार आहे.

Updated: Jan 3, 2012, 07:13 PM IST

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आजही दुग्धव्यवसाय फायदेशीर ठरतो. मात्र दुधाळ जनावरांच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकऱ्यांना महागडी जनावरं खरेदी करण शक्य होत नाही त्यामुळे इच्छा असूनही शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय करता येत नाही. मात्र तुरळक अटी शर्थी मान्य असतील तर ६० हजार रुपये किंमतीची दुधाळ म्हैस तुमच्या गोठ्यात आणायला समृध्द फुड्सचं तुम्हाला मदत करु शकेल.

 

मुऱ्हा जातीची म्हैस दोन्ही वेळेला सरासरी ८ ते १० लिटर दुध देते. या म्हशीची बाजारातील किंमत आहे ५० ते ६० हजार रुपये. एवढ्या रक्कमेत शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय सहज सुरु करता येतो. मात्र तोट्यात असलेल्या शेतकऱ्याला एवढा खर्च परवडत नाही. त्यामुळे ‘समृध्द फुड्स’ने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ‘किसान योजना’ सुरु केली आहे. राज्यात अशा प्रकारची योजना एकेकाळी दुधाचा महापूर असणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगांवामधून सुरु केलीय. लाभार्थ्यांना एक ते पाच म्हशींचं वाटप करण्यात येतंय. या म्हशीच्या चारा-पाण्याचा खर्च शेतकरी करणार असून दुधाची खरेदी ‘समृध्द फूड्स’ करणार आहे. शेतकऱ्याला मात्र म्हशीच्या भरण पोषण, विमा आणि होणाऱ्या रेडकूचीही निगा घ्यावी लागणार आहे.

 

या योजनेच्या माध्यमातून केवळ चाळीसगांवमध्ये ५ हजार म्हशींचं वाटप करण्यात येणार आहे. शेती परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेला उदंड प्रतिसाद दिलाय. तसेच शेतकऱ्यांना  शेणखतही सहजा सहजी मिळणार आहे.

 

चारा टंचाईच्या काळात ही समृध्द फूड्स ही संस्था शेतकऱ्यांच्या मागे उभी आहे. त्यामुळे ‘समृध फुडस’ची ही योजना वाखणण्याजोगी आहे. शेतकऱ्यांना उभं करुन बळ देणारे असे उपक्रम शेतीला आणि शेतकऱ्याला दुधाइतकेच पोषक ठरणार आहे.