झी २४ तास वेब टीम, नाशिक
विकिपीडिया साईटमुळे कुठलीही माहिती एका क्लिकसरशी मिळते. मात्र, भारतीय भाषांमध्ये लेख देण्यास ही साईट सक्षम नसल्यानं भारतीयांची नाराजी ओढवून घेण्याची वेळ येऊ नये यासाठी विकीपीडियानं पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात वेबसाईटद्वारे विकीपीडियाचे लेख भारतीय भाषांमध्ये रुपांतरीत करता येण्यासाठी नाशिकच्या सुनील खांडबहालेंशी संपर्क साधला आहे. जगाच्या पाठीवर विविध प्रादेशिक भाषा असलेला भारत हा एकमेव देश आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये राहणाऱ्या सुनील खांडबहाले या तरूणाला मराठी भाषेव्यतिरिक्त इंग्रजी समजावून घेणं त्रासदायक ठरत असे. त्यामुळं सुनीलनं संगणकाचा उपयोग करून त्वरेनं भाषा शिकण्यासाठी ऑनलाईन डिक्शनरी तयार केलीए. या साईटचे आजघडीला १५० देशांमध्ये ४ कोटी युजर्स असल्यानं विकीपीडियाही सुनीलच्या संपर्कात आहेत.
या वेबसाईटवर हिंदी, गुजराती, तामिळ, तेलगू, कन्नड,मल्याळम, पंजाबी, बंगाली, संस्कृत, अशा १० भाषा आहेत. तसंच आता त्यांनी विदेशी भाषांवर लक्ष केंद्रीत केलं. विना मोबदला राष्ट्रीय एकात्मतेचं काम करणाऱ्या सुनीलचं कौतुक राष्ट्रपतींनीही केलं आहे. ग्रामीण भागातून आलेल्या या तरूणाकडे संगणकाचं ज्ञान नसतानाही त्यानं घेतलेल्या भरारीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे