मुंबई: शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीने मंगळवारी एकमताने मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे येत्या १ डिसेंबरला उद्धव ठाकरे शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आज संध्याकाळी ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची बैठक झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी अनुमोदन दिले.
Resolution proposing Uddhav Thackeray's name as the Chief Minister candidate and leader of 'Maha Vikas Aghadi' passed unanimously by all MLAs. #Maharashtra pic.twitter.com/nUmXeJMroG
— ANI (@ANI) November 26, 2019
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंती पाटील यांनी महाविकास आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. यानंतर सभागृहात एकच जल्लोष पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे हे साधे, सरळ आणि विचारी व्यक्ती आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदासाठी योग्य असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता. शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बसविण्याचे वचन मी बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते. कोणत्याही परिस्थितीत मी ते वचन पूर्ण करणारच, असा आक्रमक पवित्रा शिवसेनेने घेतला होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. याची परिणती युती तुटण्यात झाली होती. मात्र, तरीही शिवसेनेने नमते घेण्यास नकार दिला होता. या सगळ्यात शिवसेना नेते संजय राऊत यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. भाजपच्या प्रत्येक इशाऱ्याला त्यांनी आक्रमक भाषेत प्रत्युत्तर देत शेवटपर्यंत शिवसेनेची बाजू लावून धरली होती. अखेर शिवसेनेच्या या प्रयत्नांना आज यश आले.
येत्या १ डिसेंबरला शिवतीर्थावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यासाठी उद्धव ठाकरे थोड्याचवेळात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करतील. आतापर्यंत ठाकरे घराण्यातील कोणत्याही व्यक्तीने राजकीय पद स्वीकारले नव्हते. त्यांच्याकडून केवळ रिमोट कंट्रोलने सत्तेची सूत्र हलवली जात असत. मात्र, आदित्य ठाकरे आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे घराणे पहिल्यांदाच प्रत्यक्ष राजकारणाच्या मैदानात उतरणार आहे.