ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींच्या कारची तोडफोड, मुख्यमंत्र्यांवर असभ्य भाषेत केली होती टीका

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौरांना अटक करण्यात आलीय. तर शिवसेना ठाकरे गटानं या शिवीचं समर्थन केलंय. आता अज्ञातांनकडून दत्ता दळवींच्या कारची तोडफोड करण्यात आली आहे.

राजीव कासले | Updated: Nov 29, 2023, 07:01 PM IST
ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींच्या कारची तोडफोड, मुख्यमंत्र्यांवर असभ्य भाषेत केली होती टीका title=

Maharashtra Politics : मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी (Datta Dalvi) यांच्या कारची अज्ञातांकडून तोडफोड (Vandalized) करण्यात आली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भांडूप परिसरात तोडफोडीची घटना घडली आहे. दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याविरोधात असभ्य भाषेत टीका केली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. 12 डिसेंबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. दत्ता दळवी यांची रवानगी ठाणे जेलमध्ये झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांनी शिवीगाळ केली होती. राजस्थानातील प्रचारसभेत मुख्यमंत्री शिंदेंच्या नावापुढं हिंदूहृदयसम्राट अशी उपाधी लावण्यात आली होती. त्यावर टीका करताना भांडूपच्या सभेत दत्ता दळवींनी मुख्यमंत्र्यांना शिवी घातली.

संजय राऊतही आक्रमक

दत्ता दळवींच्या अटकेची बातमी कळताच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी तत्काळ भांडूप पोलीस स्टेशनला धाव घेतली. त्यावेळी शिवीगाळीचं समर्थन करताना राऊतांनीही पुन्हा तीच शिवी घातली. धर्मवीर सिनेमातही ही शिवी होती, तेव्हा कारवाई का केली नाही, असा उलटसवालही त्यांनी केला. दरम्यान दत्ता दळवींना उद्या जामीन मिळाला नाही तर ईशान्य मुंबई बंद करण्याचा इशारा आमदार सुनील राऊतांनी दिलाय. दत्ता दळवी यांची कार फोडणाऱ्या लोकांची ओळख पटली असून ते शिंदे गटाचे आहेत. शिंदे गटाला जशासतसं उत्तर देऊ असा इशारा सुनील राऊत यांनी दिला आहे. 

शिंदे गटाचं प्रत्युत्तर

दत्ता दळवी यांनी ईशान्य विभागपदावरुन उद्धव ठाकरे यांनी काढून टाकलं होतं. पदाधिकारी नेमणुकांमध्ये दत्ता दळवी पैसे घ्यायचे, ते दत्ता दळवी मुख्यमंत्री एकनात शिंदे यांना अश्लाघ्या भाषेत शिव्या देतात, शिंदे गटात येण्यासाठी दत्ता दळवी यांनी दहा-दहा वेळा विनंती केली ते दत्ता दळवी केवळ उद्धव ठाकरेंचा निष्ठावंत असल्याचं दाखवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे. सुनील राऊत यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्याच मतदारसंघातील लोकांचा मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा आहे. त्यामुळे ते बरळत असल्याची टीकाही म्हस्के यांनी केलीय.

मुख्यमंत्री आणि महापौर ही दोन्ही संवैधानिक पदं आहेत. केवळ या पदांवर बसणाऱ्या नेत्यांनीच नव्हे, तर सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या प्रत्येकानंच सभ्यता बाळगणं गरजेचं आहे.. जाहीर सभेतून आणि मीडियासमोर शिव्या देण्यापर्यंत राजकीय नेत्यांनी मजल मारलीय... महाराष्ट्रातल्या राजकारणाची पातळी किती घसरली आहे, हेच यानिमित्तानं पुन्हा दिसून आलं.