मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी दत्ता दळवींना अटक; राऊत म्हणाले, 'आनंद दिघेंच्या तोंडी...'

Shiv Sena leader Datta Dalvi Arrested : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना भांडूप पोलिसांनी अटक केली आहे. राहत्या घरातून पोलिसांनी दत्ता दळवी यांना ताब्यात घेतलं आहे. 

आकाश नेटके | Updated: Nov 29, 2023, 11:10 AM IST
मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी दत्ता दळवींना अटक; राऊत म्हणाले, 'आनंद दिघेंच्या तोंडी...' title=

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना उबाठा गटाच्या माजी महापौर दत्ता दळवी यांना भांडूप पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. भांडूप येथे सभेत दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सकाळी दत्ता दळवी यांना पोलिसांनी अटक केली. अटकेची बातमी समजताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भांडूप पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे देखील दत्ता दळवी यांची भेट घेण्यासाठी भांडूप पोलीस ठाण्यात पोहोचले होते.

दत्ता दळवी यांच्यावर भा.द.वी कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हा दुसरा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी भांडुप पोलिस अधिक तपास करत आहेत. सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडूप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

"जर आनंद दिघे असते तर या गद्दारांना चाबकाने फोडून काढले असते असे दत्ता दळवी म्हणाले. त्यांनी काय चुकीचे म्हटले. त्यांनी यावेळी भोXXX शब्द वापरला. हा शब्द धर्मवीर चित्रपटामध्ये आनंद दिघेंच्या तोंडी घातलेला आहे. सेन्सॉरने तो काढला नाही. धर्मवीर चित्रपटात आनंद दिघेंच्या तोंडी तो शब्द तसाच्या तसा आहे. जर तो शब्द आक्षेपार्ह असेल तर चित्रपटाचे निर्माते, प्रायोजक, कलाकार यांच्यावर सरकारने गुन्हा दाखल केला का? तो शब्द दत्ता दळवी यांनी वापरला तर त्यांना अटक कशी केली जाते. काही दिवसांपूर्वी नारायण राणे इथे आले होते. त्यांनी भाषण करुन शिव्या घातल्या. तेव्हा गु्न्हा दाखल केला. अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल केला? पण दत्ता दळवी यांनी एक लोकभावना व्यक्त केली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला," असे संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी भांडुपमधील ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहिर मेळावा आयोजित केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख 'हिंदुह्रदयसम्राट' केल्याने या या मेळाव्यात माजी महापौर दत्ता दळवी यांनी जोरदार टीका केली होती. तसेच दत्ता दळवी यांनी जाहीर सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केली. यावरून शिंदे गटाचे नेते तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर आता दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे.