'श्वान गाडी खाली आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो' देवेंद्र फडणवीस यांचं विरोधकांना उत्तर

Abhishek Ghosalkar Muder : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल गोळीबारात हत्या करण्यात आली. अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. 

राजीव कासले | Updated: Feb 9, 2024, 03:01 PM IST
'श्वान गाडी खाली आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो' देवेंद्र फडणवीस यांचं विरोधकांना उत्तर title=

Mumbai : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक माजी नगरसवेक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांचा शुक्रवारी झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला. आज त्यांचं पार्थिव  त्यांच्या बोरिवली इथल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. यावेळी अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि मुलीने हंबरडा फोडला. माजी आमदार विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांच्या डोळ्यातील अश्रुही थांबत नव्हते. दरम्यान, ठाकरे कुटुंबाने घोसाळकरांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), रश्मी ठकरे आणि आदित्य ठाकरेंसह संजय राऊत, अनिल परब आणि सुनील प्रभू हे नेतेही उपस्थित होते.  

दोन जणं ताब्यात
अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतलंय. मेहुल पारिख आणि रोहित साहू अशी या दोघांची नावं आहेत. ज्यावेळी घोसाळकरांवर गोळीबार झाला त्यावेळी मेहुल पारिख हा मॉरिसच्या कार्यालयाबाहेर होता. तो घोसाळकरांची रेकी करत असल्याचा आरोप घोसाळकरांचे सहकारी चेतन परमार यांनी केलाय. तर या प्रकरणी रोहित साहू या तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या दोघांच्या चौकशीतून  घोसाळकरांच्या हत्येचं गूढ उकलण्याची शक्यता आहे. 

संजय राऊत यांचा आरोप
शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) गंभीर आरोप केलाय. संजय राऊत यांनी मॉरिस आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो ट्विट केलाय.. मॉरिस नरोना हा चार दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर गेला होता. तिथे शिंदे यांनी त्याला आपल्या पक्षात येण्याचे निमंत्रण दिल्याचा आरोप राऊतांनी केलाय. वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय. महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा रोज गुंड टोळ्याना भेटत आहेत. पक्षात प्रवेश देत आहेत. गृहमंत्री पूर्ण अपयशी झाले असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राऊतांनी केलीये.

गृहमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर
अभिषेक घोसाळकरांच्या हत्येप्रकरणी गृहमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलीय. अभिषेक घोसाळकरांच्या हत्येची घटना अत्यंत दु:खद असून, या घटनेचं कुणीही राजकारण करू नये असं फडणवीसांनी म्हटलंय. घोसाळकरांची हत्या का झाली...? याचा तपास करण्याचे आदेश दिले असून, वैयक्तिक वैमनस्यातून घडलेली ही घटना असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. तसंच पिस्तूल कुठून आली याचा तपास करण्याचे आदेशही फडणवीसांनी दिलेयत. तरुण नेत्यांच निधन होणं हे वाईट आहे. याला राजकीय रंग देणं चुकीचं आहे. असं फडणवीस यांनी म्हटलंय. 

या घटनेनंतर विरोधकांनी गृहमंत्री फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. यावर बोलताना  श्वान गाडी खाली आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो, असं फडणवीस यांनी म्हटलंय. घोसाळकर यांची हत्या ही दु:खद घटना आहे. याला राजकीय रंग देणं चुकीचं आहे. ही वैयक्तिक वैमनस्यातून घटना घडल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय.

फेसबुक लाईव्ह करत हत्या
ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेतल्या अभिषेक घोसाळकरांना दहिसरच्या करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.. मात्र त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यावर गोळ्या झाडणा-या मॉरिस नोरोन्हा यानंही स्वतःवर गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे मॉरिस भाई आणि अभिषेक घोसाळकर हे फेसबुक लाईव्ह करत होते.. फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर मॉरिसनं अभिषेक घोसाळकरांवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या.