राज्यात दहावी आणि बारावीचे वर्ग पुन्हा सुरू होणार?

पडताळणी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिक्षण विभागाला सूचना

Updated: Jun 22, 2021, 10:23 PM IST
राज्यात दहावी आणि बारावीचे वर्ग पुन्हा सुरू होणार? title=

मुंबई : राज्यात कोरोनामुक्त गावात दहावी, बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळून पहावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. जी गावे गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता 10 आणि 12 वी चे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पहाण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर काहीसा ओसरता दिसतोय. या पार्श्वभूमीवर 5 टप्प्यांमध्ये राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. काही जिल्ह्यातील गावांमध्ये कोरोनाची संख्या कमी झाल्याचं दिसून येत आहे. अशा गावांमध्ये दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत चाचपणी करण्यात येणार आहे. 

आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक पार पडली. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड,  मुख्य सचिव सीताराम कुंटे तसंच शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनामार्फत उचलण्याबाबतची योजना शालेय शिक्षण विभागामार्फत प्रस्तावित करण्यात येत आहे. शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासाठी लागणाऱ्या निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.