'तुम सेक्स करोगी?' घरात घुसून स्विगी डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Crime : पुण्यात स्विगी डिलिव्हरी बॉयने एका तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी स्विगी डिलिव्हरी बॉयवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 7, 2023, 08:57 AM IST
'तुम सेक्स करोगी?' घरात घुसून स्विगी डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग; पुण्यातील धक्कादायक प्रकार title=
(प्रातिनिधीक छायाचित्र - PTI)

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) स्विगीच्या (Swiggy) डिलिव्हरी बॉयने एका तरुणीसोबत अश्लिल कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सॅनिटरी नॅपकिन घेऊन घरी आलेल्या स्विगीच्या डिलिव्हरी बॉयने घरात घुसून 26 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल फोनला चार्जिंग करण्याच्या नावाखाली डिलिव्हरी बॉय घरात घुसला होता. त्यानंतर त्याने तरुणीकडे  थेट शरीर सुखाची मागणी केली. त्यानंतर या तरुणीने पोलिसांत (Pune Police) तक्रार दिली आहे.

वाकडेवाडीतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा संपूर्ण प्रकार घडला. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार स्विगीच्या डिलिव्हरी बॉयविरोधात खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

फिर्यादी तरुणीने स्विगीवरून घरगुती सामान मागवले होते. सामान आल्यानंतर ते तपासून पाहिले असता त्यातील सॅनिटरी पॅडचे पॅकिंग फोडल्याचे आढळून आले. त्यानंतर तरुणीने स्विगीला मोबाईलवरून फाटलेल्या सॅनिटरी पॅडचा फोटो पाठवला. स्विगीकडे तक्रार केल्यानंतर नवीन सॅनिटरी नॅपकिनचे पाकिट घेऊन आरोपी डिलिव्हरी बॉय घरी आला होता. त्यानंतर डिलिव्हरी बॉयने तरुणीकडे पैशाची मागणी केली. त्यावर फिर्यादी तरुणीने स्विगीशी बोलून घ्या असे त्याला सांगितले.

त्यानंतर मोबाईल फोन चार्जिंग करण्याच्या बहाण्याने आरोपी तरुणीच्या घरात शिरला. घरात शिरल्यानंतर संबंधित डिलिव्हरी बॉयने तुम सेक्स करोगी असे म्हणत फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न केली. तसेच अश्लील हावभाव केले. त्यामुळे तरुणीने थेट खडकी पोलीस ठाणे गाठत डिलिव्हरी बॉयविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खडकी पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरुन डिलिव्हरी बॉयविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला आहे. 

फुकटात सिगारेट न दिल्याने डोक्यात बियरची बाटली फोडली

फुकटात सिगारेट देण्यास नकार दिल्याने दोघांनी पान टपरी चालकाच्या डोक्यात बियरची बाटली फोडली. येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सैनिक वाडी वडगाव शेरी परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी रोशन कुमार संतलाल कोरी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी इसमानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दोन्ही तरुण हे पीडित पान टपरी चालकाकडे गेले होते. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांच्याकडे फुकटात सिगरेट मागितली. मात्र फिर्यादीने फुकट सिगरेट देण्यास नकार दिल्याने आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात बिअरची बाटली मारली. आरोपींनी फिर्यादीला दगडाने देखील मारहाण केली. तसेच फिर्यादींच्या टपरीच्या बाजूला असणाऱ्या टेलर दुकानदार पाणीपुरीवाला आणि नारळवाला यांना देखील शिवीगाळ करत धमकी दिली. तिरोडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.