केस कापायला पैसे दिले नाहीत म्हणून पतीची पत्नीला पट्ट्याने मारहाण; पुण्यातील विचित्र प्रकार

Pune Crime : पुण्यात पतीने पत्नीला शिवीगाळ करत पट्ट्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. केस कापण्यासाठी पैस न दिल्याने पतीने पत्नीला जबर मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलिसांंनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

आकाश नेटके | Updated: Sep 11, 2023, 11:55 AM IST
केस कापायला पैसे दिले नाहीत म्हणून पतीची पत्नीला पट्ट्याने मारहाण; पुण्यातील विचित्र प्रकार title=
(प्रातिनिधीक छायाचित्र - PTI)

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुणेकर (Pune News) कधी काय करतील याचा अंदाज कोणालाच नाही. पुण्यात पत्नीने केस कापण्यासाठी पैसे न दिल्याने चिडलेल्या पतीने तिला पट्ट्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. केस कापण्यासाठी पैसे न दिल्याने पैसे न दिल्याने आरोपी पती चिडला होता. त्यामुळे त्याने संतापाच्या भरात पत्नीला मारहाण केली आहे. पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीनंतर पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पतीने पत्नीकडे केस कापण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या पतीने पत्नीला कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. उत्तम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी 47 वर्षीय पत्नीने तक्रार दिली आहे. त्यानुसार 56 वर्षीय पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी हे पती-पत्नी आहेत. आरोपी पतीने शनिवारी फिर्यादी पत्नीकडे केस कापण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र पत्नीने पैसे देण्यासाठी नकार दिला होता. त्यामुळे चिडलेल्या पतीने पत्नीला शिवीगाळ करत तुझ्याकडे बघून घेतो म्हणत धमकी दिली. त्यानंतर कमरेच्या पट्ट्याने पत्नीला बेदम मारहाण केली. फिर्यादीची 17 वर्षीय मुलगी मध्यस्थी करण्यासाठी आली असता आरोपीने तिला देखील हाताने आणि पट्ट्याने मारहाण केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.

पुण्यात भररस्त्यात तरुणाला लुटले

पुण्यात रात्रीच्या सुमारास दुचाकीने घरी निघालेल्या एका तरुणाची भर रस्त्यात लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. घरी निघालेल्या तरुणाला दुचाकीवर अडवून धारदार शस्त्र काढून या तरुणाच्या गळ्याला लावला. तुझ्याजवळ जे काही असेल ते काढून दे असं म्हणत या तरुणाजवळील 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला. हा संपूर्ण प्रकार घडला खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सह्याद्री हॉस्पिटल समोर घडला आहे. स्वप्निल साहेबराव कांबळे या तरुणाने याप्रकरणाची पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी हा रात्री सह्याद्री हॉस्पिटल समोरील रस्त्याने जात होता. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी दुचाकीवरून येत गाडी आडवी लावली आणि गाडी का थांबवली असे विचारत धारदार हत्यार काढले. त्यानंतर हत्यार या तरुणाच्या गळ्याला लावत तुझ्याजवळ जे काही सामान आहे ते आम्हाला काढून दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत फिर्यादीचा 22 हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला.