ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार

Pune : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कास्पदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सोमेश्वर फांऊडेशनचे अध्यक्ष सनी निम्हण यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.  

राजीव कासले | Updated: Aug 29, 2024, 10:34 PM IST
ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार title=

Pune : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नेमबाजीत कास्पदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेचा पुण्यात भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सोमेश्वर फांऊडेशनचे अध्यक्ष सनी निम्हण यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. क्रीडा जागृती संस्थेच्या सोबत होणाऱ्या या सोहळ्यात स्वप्नीलच्या कोच दिपाली देशपांडे यांचाही सत्कार होणार आहे. तसंच ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केलेल्या तिरंदाज प्रवीण जाधव आणि एथलीट सर्वेश कुशारे यांचा ऑलिम्पियन हॉकीपटू धनराज पिल्ले, केंद्रीय नागरी हवाई वाहतुक मंत्री मुरलीधर मोहळ, आणि राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत एक लाख रुपये देऊन सत्कार करण्यात येणार आहे. शनिवारी 31 ऑगस्टला सकाळी नऊ वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्निल कुसळेने (Swapnil Kusale) इतिहास रचला. तब्बल 72 वर्षांनी स्वप्निल कुसळेने महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दिलं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये  (Paris Olympic 2024) महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळेनं 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या प्रकारात स्वप्नीलनं एकूण 451.4 गुण मिळवले. स्वप्निल कुसळेने इजिप्तमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत चौथं स्थान मिळवत ऑलिम्पिक पात्रता मिळवली होती. त्यानंतर 2024 मध्ये त्याने ट्रायल्समधून पॅरिस ऑलिम्पिकचं तिकिट निश्चित केलं. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा हा स्वप्निलचा प्रेरणास्थान आहे.

धोनीला मानतो आदर्श
स्वप्निलचा आदर्श हा भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आहे. धोनीच्या शांत आणि संयमी राहण्याच्या स्वभावाचा आपल्यावर फार मोठा प्रभाव असल्याचं स्वप्निलनेच सांगितलं आहे. पात्रता फेरीमध्ये टॉप 8 मध्ये राहून पुढच्या फेरीसाठी पात्र ठरल्यानंतर स्वप्निलनेच हा खुलासा केला. "मी रेंजवर असता मला फार गप्पा मारायला आवडत नाही. शांत आणि संयमी राहण्यास माझं प्राधान्य असतं. अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी मला या दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. मी धोनीचा फार मोठा चाहता आहे. मैदानामध्ये कितीही तणाव असला तरी तो शांत अन् संयमी असतो. मला हे फार भावते. मलाही अशाच पद्धतीने वावरायला आवडतं," असं स्वप्निल म्हणाला. विशेष म्हणजे धोनी आधी ज्याप्रमाणे तिकीट तपासणीस म्हणजेच टीसी म्हणून काम करायचा त्याप्रमाणे स्वप्निलही टीसीच आहे. कोल्हापूरमधील कांबळवाडी गावात जन्मलेला 29 वर्षीय स्वप्निल मागील 12 वर्षांपासून ऑलिम्पिकसाठी प्रयत्न करत होता.