राष्ट्रवादी फोडून महायुतीशी घरोबा करणारे अजित पवार तिसऱ्या आघाडीत जाणार? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेन्स

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर माफी मागीतली त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं. सत्ताधारी पक्षातील घटक पक्ष आंदोलन करत असल्यानं अजित पवारांच्या मनात काय ? याची चर्चा सुरू झालीय 

वनिता कांबळे | Updated: Aug 29, 2024, 09:44 PM IST
राष्ट्रवादी फोडून महायुतीशी घरोबा करणारे अजित पवार तिसऱ्या आघाडीत जाणार? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेन्स title=

Ajit Pawar Third Alliance In Maharashtra : मालवण पुतळा दुर्घटनेवरुन महायुतीतील घटक पक्षानं वेगळी भूमिका घेतली असल्याचं पाहायला मिळतंय.. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं काल अजित  पवारांनी 13 कोटी जनतेची माफी मागितील होती त्यानंतर आज सुद्धा अजित पवारांनी आपल्या विधानाचा पुनरुच्चार केलाय.. दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं अजित पवार म्हणालते.

शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महायुतीतल्या नेत्यांनी नौदलावर खापर फोडून वादाला आमंत्रण देणारी वक्तव्य करत असताना अशावेळी मात्र, अजितदादांनी महाराष्ट्राची माफी मागत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अजितदादांनी माफी मागितल्यानंतर  सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी पक्षानं मुंबई, पुणे,ठाणे आणि नाशिक शहरात आंदोलन केलं आणि पुतळा प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. शिवरायांचा पुतळा अपघात प्रकरणानंतर अजित पवारांच्या पक्षांकडून आंदोलन का केलं जातंय? सत्ताधारीच आंदोलन का करत आहेत ? दादांच्या मनात काय आहे,असा प्रश्न विचारला जात आहे.

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महायुतीतल्या नेत्यांनी गांभीर्य दाखवत जबाबदारपणे वक्तव्य करणं अपेक्षित होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांसह महायुतीतल्या अनेक नेत्यांनी वादाला आमंत्रण देणारी वक्तव्य केली. याऊलट अजित पवारांनी जनभावना समजावून घेत जनतेची माफी मागितली आणि महायुतीतलं आपली स्वत:ची वेगळी भूमिका असल्याचं सिद्ध केलं.  शिवरायांचा पुतळा अपघात प्रकरणच नव्हे तर अजित पवारांनी अनेकदा यापूर्वी महायुतीतल्या नेत्यांपेक्षा वेगळी भूमिका मांडत महायुतीत आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवल्याचं दिसून येतंय. 

दादांच्या मनात काय?

लाडकी बहिण योजनेतील मुख्यमंत्री शब्द वगळला.  विशाळगडावरील दंगल पीडितांची भेट घेतली. मुंबै बँकेला जागा देण्याला वित्त विभागामार्फत  हरकत घेतली.  'आता जमिनी विकू का?' अस म्हणत निधी देण्यावरून मंत्र्यांना सुनावलं. भाजपचा विरोध असतानाही मलिकांना सोबत घेतलं असे काही निर्णय अजित पवार यांनी घेतले. यामुळे दादांच्या मनात काय अशी चर्चा रंगली आहे. 

हे देखील वाचा... महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय प्रयोग; संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजरत्न आंबेडकर तिघांनी निर्णय घेतला

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडून महायुतीशी घरोबा केला. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना केवळ एकच जागेवर समाधान मानावं लागलं. तसेच भाजपलाही कमी जागा मिळाल्या. अजित पवाराना महायुतीत घेतल्यानंतर  संघाच्या मुखपत्रातून अजित पवारांवर टीका करण्यात आली. या टीकेनंतर अजित पवार गटात नाराजी दिसून आली. महायुतीमधून अजित पवार यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशाही चर्चा सुरू आहेत. विधानसभा निवडणूक महायुती एकत्र लढणार की नाही याबाबत साशंकता असल्याचं मोठं विधान आमदार अमोल मिटकरींनी केलं होतं. अजित पवार तिसऱ्या आघाडीत जाणार का ? याचीही सध्या चर्चा सुरू आहे. संघाची टीका असो की शिवरायांच्या अपघात प्रकरणावरून माफी असो आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचा पक्ष वेगळी वाट धरणार का ? याची चर्चा सुरू आहे.