Mumbai Crime News: पत्नी सकाळीच एकटी मॉर्निग वॉकला गेली म्हणून पतीने तिला घटस्फोट दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील मुंब्रा परिसरातील ही घटना आहे. पत्नी सकाळी एकटीच मॉर्निंग वॉकला गेल्याने संतप्त पतीने तिच्या वडिलांना फोन वरुन तिला तिहेरी तलाक देत असल्याचे सांगितले. जावयाचा असा फोन आल्याने तिच्या वडिलांना एकच धक्का बसला. या प्रकरणी पत्नीने पतीविरोधात मुस्लिम कायदा कलम 4 प्रमाणे तिहेरी तलाकच्या कायद्याखाली तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जानेवारी 2024 मध्ये कुर्ला येथे राहणाऱ्या अलिखान याच्याशी महिलेचे लग्न झाले होती. महिला गर्भवती असल्याने ती तिच्या आई-वडिलांच्या घरी मुंब्रा येथे आली होती. 10 डिसेंबर रोजी तिला तिच्या पतीने फोन केला तेव्हा ती मॉर्निंग वॉकला बाहेर गेली होती. पतीला हे समजताच त्याने तिला कुर्ल्याच्या घरी येण्यास सांगितले. मात्र, गरोदर असल्याने ती त्या परिस्थितीत येऊ शकत नव्हती, हे तिने सांगताच पतीने फोन कट केला.
महिला घरी पोहोचल्यानंतर त्याने पुन्हा एकदा तिला फोन केला. त्यानंतर त्याने तिला फोन स्पीकरवर ठेवण्यास सांगितले. महिलेच्या कुटुंबासमोरच त्याने तिला तिहेरी तलाक दिला. या घटनेनंतर तिच्या कुटुंबीयांना एकच धक्का बसला. महिलेच्या कुटुंबीयांनी 11 डिसेंबर 2024 रोजी मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुंब्रा पोलिसांनी तिहेरी तलाकच्या कायद्याखाली गुन्हा नोंदवून पतीला नोटिस पाठवली आहे.
पतीने नक्की मॉर्निंग वॉकच्या कारणामुळंच तलाक दिला ही यामागे काही वेगळे कारण आहे, याचाही तपास पोलिस करत आहेत. मात्र, या कारणावरुन घटस्फोट घेतल्याचे पाहून परिसरातही एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.