Ajit Pawar On Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जोरदार धक्का बसला. महाविकास आघाडीने अनेक ठिकाणी बाजी मारली अन् महायुतीला मोठा धक्का दिलाय. अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीचं वारं राज्यभरात वाहू लागलंय. मात्र, महायुतीमध्ये मतभेद असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. तसेच महायुतीमधील आमदारांचे नाराजीचे सूर उमटत असल्याचं देखील बोललं जातंय. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय.
राजकारणातील सर्व निर्णय माझेच असतात. बारामतीच्या निकालाला मीच जबाबदार आहे. सुप्रिया सुळेंविरोधात पत्नीला उभं करणं ही माझी चूक होती. कुटुंबाच्या बाबतीत माझा हा निर्णय चुकीचा आहे, असं अजित पवार म्हणाले. कुटूंबाबाबत बोलण्याचा मला अधिकार आहे, असंही अजित पवारांनी एएनआयला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी महायुतीवर देखील भाष्य केलं.
बारामतीत शरद पवार यांच्यासोबत पुन्हा जाणार का? असा सवाल जेव्हा अजित पवार यांना विचारला गेला, तेव्हा अजित पवार यांनी 'नो कमेंट्स' म्हणत उत्तर दिलं. माझी शरद पवारांशी स्पर्धा नाही पण मी माझ्या हिशोबाने पुढं जातोय आणि ते त्यांच्या हिशोबाने पुढे जातायेत, असंही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.
"No comments...": Ajit Pawar on rejoining hands with Sharad Pawar for upcoming Maharashtra polls
Read @ANI story | https://t.co/BIo62muFS9#SharadPawar #NCP #Maharashtrapolls #AjitPawar pic.twitter.com/kE4JiQ1Vaf
— ANI Digital (@ani_digital) August 15, 2024
महायुतीमध्ये मतभेद आहेत का? असा सवाल अजित पवार यांना विचारला गेला. तेव्हा अजित पवारांनी महायुतीत मतभेद नसल्याचं सांगितलं. माझ्यानंतर येऊन फडणवीस आणि शिंदे मुख्यमंत्री झाले. मी मागे म्हटलो होतो, ते मस्करी करताना म्हटलं होतं. मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ महत्त्वाचं असतं, असं अजित पवार यांनी म्हटलंय. आगामी निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळेल, अशा विश्वास देखील अजितदादांनी व्यक्त केलाय.
मुख्यमंत्रीपदावरुन अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. निवडणूक न लढवता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. कारण त्यांच्याकडे बहुमताचा आकडा होतो. तसेच नशीबाचा भाग असतो, असं अजित पवार म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण खासदार होते. केंद्रात मंत्री होते. तरीही ते मुख्यमंत्री बनले, असं कधीकधी होतच असतं, असंही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.