शपथविधीकडे विरोधकांची पाठ, सरकार-विरोधकांमध्ये खडाजंगीला सुरुवात!

Oath-taking Ceremony: शपथविधीला पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीही हजर होते. मात्र विरोधी पक्षातील एकही नेता शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हता. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 6, 2024, 08:45 PM IST
शपथविधीकडे विरोधकांची पाठ, सरकार-विरोधकांमध्ये खडाजंगीला सुरुवात! title=
शपथविधी

Oath-taking Ceremony: महायुती सरकारचा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडला. देशभरातील अनेक दिग्गज या सोहळ्यासाठी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीही हजर होते. मात्र विरोधी पक्षातील एकही नेता शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हता. यावरून भाजपनं विरोधकांवर टीकास्त्र डागलंय.

महायुती सरकारचा भव्यदिव्य शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित होते. बॉलीवूड क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटी, साधू मंहत या सोहळ्याचे साक्षीदार होते. मात्र विरोधी पक्षातील नेते शपथविधी सोहळ्याला दिसले नाहीत. विरोधी पक्षातल्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं. तरीही विरोधक उपस्थित राहिले नाहीत, अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलीय. उद्धव ठाकरे, शरद पवारांना निमंत्रण देऊनही ते शपथविधी सोहळ्याला आले नाहीत, ही कोती वृत्ती आहे अशी टीका उपाध्ये यांनी केलीय. इतकंच नाही तर 2019साली उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते याची आठवणही उपाध्ये यांनी करून दिलीय.

हा लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा शपथविधी होता.नेते उपस्थित राहिले असते तर विकासासाठी एक आहोत असा संदेश गेला असता.2019 साली उद्धव ठाकरे यांनी लोकांचा विश्वासघात करत सीएमपदाची शपथ घेतली होती.त्या शपथविधी सोहळ्याला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.'महाराष्ट्र हिताच्या कोरड्या गप्पा मारतो' वेळ आली तर विरोधात जातो हाच संदेश गेला, असंही उपाध्ये यांनी ट्विट करून म्हटलंय.विरोधकांच्या गैरहजेरीवर शिवसेनेही टीकास्त्र सोडलंय. 

यावरून मात्र अंबादास दानवेंनी हल्लाबोल केलाय. ज्यांनी लोकशाहीचा खून केला अशांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित न राहणंच योग्य, अशी टीका दानवेंनी केलीय. तर आम्हाला फडणवीसांनी निमंत्रण दिलं नव्हतं, असा दावा काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केलाय.पटोले यांच्या आरोपांचं भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी खंडन केलंय. नाना पटोलेंना निमंत्रण गेलं होतं. स्वत: फडणवीसांनी अनेक नेत्यांना फोन केले होते असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.

शपथविधी सोहळा पार पडला असला तरी आता निमंत्रणावरून जुंपली आहे. महायुतीच्या विजयावर आधीच विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे. मात्र आता शपथविधी सोहळ्याला उपस्थित न राहिल्याच्या मुद्यावरून महायुती विरोधकांना घेरणार हे मात्र निश्चित.