Maharashtra Government : महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र आणि एकनाथ शिंदे तीन खुर्च्या सोडून बसले होते. महायुतीच्या शपथविधी सोहळ्यातील ही आसनव्यवस्था सगळ्यांनाच खटकलेली. अशातच महाविकास आघाडीनं एक वेगळाच आरोप केला आहे. गृहमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. जर त्यांनी ऐकलं नसत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवाय महायुती सरकारचा शपथविधी उरकण्याची तयारी भाजपने केली होती, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांनी देखील याबाबद शंका उपस्थित केली आहे. व्हॉट्सअपवर आलेल्या निमंत्रणात महायुतीच्या दोनच नेत्यांची नावे होती. ती खरी की खोटी माहीत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
संजय शिरसाट यांनी आरोप फेटाळले
महायुती सरकारचा गुरुवारी म्हणजेच 5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे नाराज असल्याची देखील चर्चा सुरु होती. अशातच विरोधकांनी देखील शंका उपस्थित केली होती. विरोधकांचे हे दावे शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी फेटाळून लावलेत. आम्हाला सोडून शपथविधी होणार नव्हताच, असं संजय शिरसाट यांनी म्हणाले.
एकनाथ शिंदे गृहखात्यासाठी आग्रही
मुख्यमंत्रीपद भूषवलेले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यासोबत उपमुख्यमंत्रीपद दिल्यास गृहखातं देखील मिळावं असाही एकनाथ शिंदे यांचा आग्रह असल्याचं म्हटलं जात आहे. नाराज असलेल्या एकनाथ शिंदे यांना डावलून शपथविधी करण्याचा कार्यक्रम भाजपने आखला होता, असा दावा विरोधकांनी केला आहे. येत्या काळात आता महायुतीमधला हा अंतर्गत संघर्ष कुठलं वळण घेणार, हे पाहावं लागणार आहे.