पुणे : पुणे शहर काँग्रेसला खिंडार पडले आहे. काँग्रेसचे माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, उपाध्यक्ष सदानंद शेट्टींसह माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे पुणे, खडकी कॅण्टोन्मेंटमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पुणे शहर काँग्रेसला खिंडार पडल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये सदानंद शेट्टी यांच्या पत्नी काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. सदानंद शेट्टी हे कॅन्टोन्मेंटमधून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही. त्या नाराजीतून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या प्रवेशाचा भाजपला कॅन्टोन्मेंट तसंच कसबा मतदारसंघात फायदा होणार आहे. पुणे शहरातील काँग्रेस पक्ष आधीच कमकुवत झालेला असताना पक्षाला हा मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेसचे माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष तसेच माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी, खडकी कॅन्टोन्मेंटचे माजी नगरसेवक आनंद छाजेड, सुधीर जानज्योत, दुर्योधन भापकर यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या उपस्थितीत विमानतळावर हा प्रवेश समारंभ पार पडला.