वय कोणतंही असलं तरी जर केस जाऊ लागले तर मनाला होणाऱ्या वेदना या तितक्याच असतात. त्यामुळे जेव्हा कोणी केस पुन्हा आणण्याचं आश्वासन देतं तेव्हा त्या प्रत्येकाच्या मनात आशेचा किरण जागा होतो. उत्तर प्रदेशात अशाच एका टकलेपणावर उपचार करण्याचा दावा करणारी एक पोस्ट व्हायर ल झाली. यानंतर मेरठमधील एका बॅकेट हॉलमध्ये तुफान गर्दी जमली होती. 20 रुपयांमध्ये उपचार करुन घेण्यासाठी मोठया संख्येने लोक येथे पोहोचले होते. आयोजकांनी अपेक्षा केली होती, त्यापेक्षा ही गर्दी जास्त होती. यानंतर टोकनच्या माध्यमातून गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
टक्कल पडण्याची समस्या दूर करण्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओनंतर रविवारी सकाळी मेरठमध्ये लोकांनी गर्दी केली होती. यावेळी सर्वांची एकच समस्या होती ती म्हणजे टक्कल पडणं.
व्हायरल व्हिडीओत केस गमावलेल्या लोकांच्या डोक्यावर विशेष औषध लावून केस उगवण्याचा दावा करणारे लोक मेरठच्या बिजनोरचे रहिवासी आहेत. दिल्लीच्या मंडोली परिसरात बऱ्याच दिवसांपासून त्यांनी कॅम्प लावला आहे.
मेरठमध्ये दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करणाऱ्या आयोजकांनी सांगितले की, दिल्ली केंद्रातही औषधाच्या दिवसात मोठी गर्दी असते, त्यात मेरठचे लोक येऊ शकत नाहीत. औषध लागू करणारे सलमान आणि अनीस हे मेरठच्या आयोजकांचे नातेवाईक आहेत, त्यामुळे त्यांनी खास विनंती करून मेरठमध्ये रविवार आणि सोमवारी दोन दिवसीय शिबिर आयोजित केले.
या कॅम्पचं आयोजन करणाऱ्यांना इतकी गर्दी होईल याचा थोडाही अंदाज नव्हता. टक्कल पडण्यावर औषध देण्याची व्यवस्था पूर्वी शौकत बँक्वेट हॉलमध्ये करण्यात आली होती. मात्र, काही वेळातच हजारोंचा जमाव जमल्याने सर्व व्यवस्था ठप्प झाली. यानंतर आयोजकांना सभागृहाऐवजी खुल्या मैदानात औषध देण्याची व्यवस्था करावी लागली. तसंच टोकन पद्धत सुरू करून गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र अनियंत्रित गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण झालं होतं.
औषध लावणारे अनीस सांगतात की, या उपचारासाठी आम्ही फक्त 20 रुपये घेते. तेलाची बाटली घेण्यासाठी 300 रुपये वेगळे द्यावे लागतात. अनीस यांच्या दाव्यानुसार, उपचार कऱण्याआधी सगळे केस काढावे लागतात आणि त्यानंतर औषध लावलं जातं. यानंतर घरी गेल्यानंतर नारळाचं तेल लावायचं असतं. एका आठवड्यात डोक्यावर छोटे केस आणि काही महिन्यात पूर्ण केस येतात.
अनीस सांगतात की, भारताच्या कोपऱ्यातून लोक त्यांच्या दिल्ली केंद्रात उपचारासाठी येतात. काही जण तर परदेशातूनही येतात. ते म्हणाले की देवाची कृपा आहे की जवळजवळ प्रत्येकाला अपेक्षित लाभ मिळतो.
दरम्यान या भागात अचानक गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या वेळी अनेक वाहने जाममध्ये अडकली. एक रुग्णवाहिकाही ट्रॅफिकमध्ये अडकलेली दिसली.