भाजपमधील एक महत्त्वाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जन्म २७ मे १९५७ ला झाला. उद्योजक ते राजकीय नेते असा त्यांचा हा प्रवास आहे. भारतीय जनता पक्षाचे ते माजी राष्ट्रीय अध्यक्ष देखील होते. नागपूर लोकसभा मतदार संघातून २,८४,८६८ मतांच्या फरकाने ते लोकसभेवर निवडून आले आहेत. गडकरींना ५,८७,७६७ मते मिळाली होती. सध्या मोदी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. याआधी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात १९९५-१९९९ दरम्यान युतीचे सरकार काळात ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते आणि किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले.
२००९ मध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. या पदावर जाणारे ते दुसरे मराठी नेते ठरले. कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची धाडसी नेतृत्व म्हणून देखील वेगळी ओळख आहे. भारतात पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. संपूर्ण देशात त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली आहे. देशात आज मोठ्या गतीने महामार्गांची निर्मिती होत आहे आणि याचं श्रेय नितीन गडकरींना जातं. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ स्थापन करून रस्ते निर्मितीसाठी खुल्या बाजारातून निधी उभारण्याची किमया त्यांनी करून दाखवली होती. हा प्रयोग भारतात पहिल्यांदाच करण्यात आला होता. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पक्षाने देखील त्यांचं आवडते खातं त्यांना दिलं. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. महामार्ग, जलमार्ग आणि गंगा नदीवरचे प्रकल्प या सर्व कामात त्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरून मोठी कामे केली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मोदींवर टीका होत असताना नितीन गडकरींना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याची मागणी होत होती.