Electric Highway: तुमच्याकडेही इलेक्ट्रिक वाहन असेल किंवा आगामी काळात तुम्ही ते खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक नवी योजना सांगितली आहे. ज्यामुळे तुमच्या आनंदाला पारावर उरणार नाहीय. मुंबईत एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रीक हायवेबद्दल माहिती दिली. दिल्ली ते जयपूर हा विद्युत महामार्ग तयार करण्याचा सरकारचा विचार आहे. याआधीही त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात दिल्ली-जयपूर इलेक्ट्रिक हायवेचा उल्लेख केला होता. काय म्हणाले गडकरी? जाणून घेऊया.
इलेक्ट्रिक हायवे हे रस्त्यांचे किंवा महामार्गांचे नेटवर्क आहे. हा हायवे इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EVs) डिझाइन करण्यात येत आहे. येथे इलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंगपासून इतर पायाभूत सुविधा दिल्या जात आहेत. इलेक्ट्रिक वाहन चालकांना लांब पल्ल्याच्या प्रवासाला अधिक सुखकर व्हावा यासाठी इलेक्ट्रीक महामार्गांवर चार्जिंग सिस्टम आहेत. शहराअंतर्गत असणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीत असे महामार्ग आल्यास इंधनाचा वापर कमी करण्यास आणि वाहनांचे उत्सर्जन कमी करण्याच्या मदत होणार आहे. त्यामुळे सरकार जितक्या लवकर शक्य होईल तितक्या वेगाने इलेक्ट्रिक हायवे विकसित करण्याच्या योजनेवर काम करत आहे.
ईटीच्या वृत्तानुसार, 6 हजार किमीचे विद्युत महामार्ग बनवण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटीचा अवलंब वेगवान करणे आणि देशभरात इलेक्ट्रिक बसेसची फ्रिक्वेन्सी सुलभ करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प पुढील सात वर्षांमध्ये सुरू केला जाणार आहे. ई-हायवेमध्येवाहने चार्ज करण्याची सुविधा असेल. ग्रीन एनर्जीवर चालणाऱ्या पायाभूत सुविधा असतील. हा उपक्रम 2030-पीएमस सार्वजनिक वाहतूक सेवा कार्यक्रमाचा भाग असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, इलेक्ट्रिक हायवेचा विकास आणि इलेक्ट्रिक बसेसची एन्ट्री एकाचवेळी होण्याची शक्यता आहे. यामुळे भारतात EV साठी इकोसिस्टमच्या स्थापनेला गती मिळणार आहे. नवीन ई-हायवे चार्जिंगमुळे पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळणार आहे. ज्यामुळे अधिक लोकांना दैनंदिन प्रवासासाठी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळेल.
गेल्या वर्षी इलेक्ट्रिक कारची विक्री 83,000 युनिट्सपर्यंत वाढली. त्यांच्या विक्रीचे लक्ष्य एक लाख ठेवण्यात आले होते. बहुतांश ग्राहकांनी पहिल्यांदाच इलेक्ट्रिक वाहन खरेदी केले. इलेक्ट्रीक वाहनाला आपल्या वाहतुकीचे प्राथमिक साधन म्हणून निवडण्यात त्यांना अजिबात संकोच वाटला नाही. बऱ्याचदा अपुरी चार्जिंग व्यवस्थेमुळे इलेक्ट्रीक वाहने घेण्यास कोणी धजावत नाही. त्यामुळे आतापर्यंत ग्राहकांनी ईव्हीकडे प्राथमिक वाहनाऐवजी दुय्यम किंवा तृतीय पर्याय म्हणून पाहिल्याचे दिसून आले आहे. जैव इंधनाच्या बाबतीतही भारताला जगात अव्वल बनवण्याचा सरकारचा विचार करत असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. नागपुरात इलेक्ट्रिक ट्रॉली बससाठी केंद्र सरकारकडून पायलट प्रोजेक्टवर काम सुरु आहे. ज्यामुळे तिकीट दर 30 टक्क्यांनी कमी होतील, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.