चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करायला का होतोय उशीर? 2 खेळाडू आहेत कारणीभूत

Champions Trophy 2025  : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्या करता मुदत वाढवून मागितली आहे. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यासाठी नेमका उशीर का होतोय याबाबत माहिती समोर आली आहे. 

पुजा पवार | Updated: Jan 13, 2025, 04:18 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करायला का होतोय उशीर? 2 खेळाडू आहेत कारणीभूत  title=
(Photo Credit : Social Media)

Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) ला सुरुवात होणार आहे. तब्बल 8 वर्षांनी आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले असून यात 8 संघ विजेतेपदाच्या ट्रॉफीसाठी मैदानात भिडणार आहेत. आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या देशांना 12 जानेवारी पर्यंत त्यांच्या संघांची घोषणा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, साऊथ आफ्रिका आणि अफगाणिस्तान इत्यादी क्रिकेट बोर्डाने त्यांच्या संघांची घोषणा केली आहे. मात्र भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्या करता मुदत वाढवून मागितली आहे. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यासाठी नेमका उशीर का होतोय याबाबत माहिती समोर आली आहे. 

टीम इंडियाची घोषणा करायला उशीर का होतोय?

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बीसीसीआय टीम इंडियाची घोषणा का करत नाही याची माहिती समोर आली आहे. टीम इंडियाची घोषणा थांबवण्यामागील मुख्य कारण दोन गोलंदाजांचा फिटनेस आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 13 खेळाडूंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. परंतु अद्याप उर्वरित दोन नावांविषयी संभ्रम आहे. यातील एक नाव वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह तर दुसरं नाव स्पिनर कुलदीप यादव याचं आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यावेळी बुमराहच्या पाठीला दुखापत झाली होती. त्याच्या पाठीला सूज येत असल्याने त्याला बंगळुरूमधील एनसीएमध्ये जाण्यास सांगण्यात आले आहे. तर काही अशीच परिस्थिती कुलदीप यादवची सुद्धा आहे. कुलदीप सुद्धा दुखापतीच्या कारणामुळे बंगळुरूच्या एनसीएमध्ये आहे. 26 तारखेपर्यंत त्याचा फिटनेस रिपोर्ट समोर येईल. सूत्रांच्या हवाल्यानुसार कुलदीप, बुमराह आणि शमी या तिघांच्या नावावर संमती झालेली आहे आता फक्त त्यांच्या फिटनेस रिपोर्टची प्रतिक्षा आहे. 

हेही वाचा : 21 व्या वर्षी सोडलं क्रिकेट, आता जय शाहांच्या जागी बनले नवे BCCI सचिव; कोण आहेत देवजीत सैकिया?

बॅकअप खेळाडूंच्या नावांवर असंमती : 

मोहम्मद शमीला इंग्लंड विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. दुखापतीनंतर तब्बल 14 महिन्यांनी शमी टीम इंडियात पुनरागमन करतोय, परंतु त्याच्या फिटनेसबाबत अजूनही अनेक प्रश्न आहेत. तर जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव सारखे खेळाडू जर फिट झाले नाहीत तर काय होईल असाही प्रश्न सिलेक्टर्सच्या समोर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ज्या खेळाडूंना बुमराह आणि कुलदीपसाठी पर्याय म्हणून स्टॅण्डबाय ठेवण्यात आलंय त्यांच्यावर कर्णधार रोहित शर्मा आणि हेड कोच गौतम गंभीर संतुष्ट नाहीत. मुकेश कुमार आणि रवी बिश्नोई यांना बॅकअप गोलंदाज म्हणून ठेवण्यात आलं आहे पण या दोघांनाही मोठ्या टूर्नामेंटमध्ये कामगिरी करण्याचा अनुभव नाही. म्हणूनच सिलेक्टर्सना बुमराह आणि कुलदीपच्या फिटनेसअहवालाची प्रतीक्षा करायची आहे, जेणेकरून टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात कुठेही कमी पडू नये. यापूर्वी 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. 

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी केव्हा जाहीर होणार भारतीय संघ? 

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 येत्या 19 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. तर याचा शेवटचा सामना हा 9 मार्च रोजी खेळवण्यात येईल. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व देशांना 12 जानेवारी पर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्याची मुदत देण्यात आलेली होती. मात्र बीसीसीआयने आयसीसीकडे ही मुदत वाढवून मागितली असून राजीव शुक्ला यांच्या माहितीनुसार बीसीसीआय 19 जानेवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करेल.