Maha Kumbh Mela: 40 कोटी भाविक, एकाने 5 हजार खर्च केले तरी जमा होणार ₹2,000,000,000,000; तेल, अगरबत्तीतूनच येणार 20 लाख कोटी

Maha Kumbh Mela Revenue: यावर्षी, महाकुंभमेळ्यात पर्यटकांसाठी सुमारे 1,50,000 तंबू, 3000 स्वयंपाकघरे, 1,45,000 स्वच्छतागृहं आणि 99 पार्किंग लॉट आहेत. 40 हजारांहून अधिक पोलिस अधिकारी सुरक्षा आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी तैनात आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jan 13, 2025, 06:53 PM IST
Maha Kumbh Mela: 40 कोटी भाविक, एकाने 5 हजार खर्च केले तरी जमा होणार ₹2,000,000,000,000; तेल, अगरबत्तीतूनच येणार 20 लाख कोटी title=

Maha Kumbh Mela Revenue: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये आज सकाळपासून महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी गंगा, यमुना आणि सरस्वती नदीचा संगम होणाऱ्या संगम येथे 50 लाख भाविकांनी पवित्र स्नान केलं आहे. जगातील सर्वात मोठा मानवजातीचा मेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, हजारो वर्षांच्या या कुंभमेळ्यात प्रयागराजमध्ये 40  कोटींहून अधिक लोक येण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे ही संख्या अमेरिका आणि रशियाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.

12 वर्षांनंतर आयोजित करण्यात येणारा हा कार्यक्रम सुमारे 4000 हेक्टरवर उभारण्यात आला आहे. 26 फेब्रुवारीपर्यंत हा महाकुंभमेळा चालणार आहे. यामुळे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. उत्तर प्रदेशने 45 दिवस चालणाऱ्या या मेगा कार्यक्रमासाठी सुमारे 7 हजार कोटींचं बजेट वाटप केलं आहे.

महाकुंभमेळ्यातून 2 लाख कोटींचा महसूल होणार जमा

महाकुंभ 2025 मुळे उत्तर प्रदेशात तब्बल 2 लाख कोटींचा महसूल जमा होण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार, 40 कोटी भाविकांपैकी प्रत्येकाने सरासरी 5000 रुपये खर्च केले तरी या कार्यक्रमातून 2 लाख कोटी रुपये मिळू शकतात.

उद्योग अंदाजांचा हवाला देत IANS वृत्तसंस्थेने सांगितलं आहे की, प्रति व्यक्ती सरासरी खर्च 10 हजारांपर्यंत वाढू शकतो आणि एकूण आर्थिक उत्पन्न 4  लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतं. यामुळे नाममात्र आणि वास्तविक जीडीपीमध्ये 1 टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची अपेक्षा आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2019 मध्ये प्रयागराजच्या अर्ध कुंभमेळ्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेत 1.2 लाख कोटी रुपयांचं योगदान दिलं. 2019 मध्ये झालेल्या "अर्ध" किंवा अर्ध्या कुंभमेळ्याने सुमारे 24 कोटी भाविकांना आकर्षित केलं होतं. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, "यावर्षी 40 कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. महाकुंभमेळ्यातून 2 लाख कोटींची आर्थिक उलाढाल होऊ शकते".

आदित्यनाथ यांनी महाकुंभचं वर्णन जगातील सर्वात मोठे तात्पुरते शहर म्हणून केलं आहे, जे कोणत्याही वेळी 50 लाख ते एक कोटी भाविकांना सामावून घेऊ शकते. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) नुसार, पॅकेज्ड फूड, पाणी, बिस्किटे, ज्यूस आणि जेवण यासह अन्न आणि पेय क्षेत्र एकूण व्यापारात 20 हजार कोटींची भर घालण्याचा अंदाज आहे.

तेल, दिवे, गंगाजल, मूर्ती, अगरबत्ती आणि धार्मिक पुस्तके यासारख्या धार्मिक वस्तू आणि अर्पण हे आर्थिक गोष्टींसाठी आणखी एक प्रमुख क्षेत्र आहे, ते अंदाजे 20 हजार कोटींचं योगदान देतात.

स्थानिक आणि आंतरराज्य सेवा, मालवाहतूक आणि टॅक्सींसह वाहतूक आणि लॉजिस्टिक्सचा वाटा 10 हजार कोटी रुपये असण्याची अपेक्षा आहे, तर टूर गाईड, ट्रॅव्हल पॅकेजेस आणि संबंधित उपक्रमांसारख्या पर्यटन सेवांचा वाटा आणखी 10 हजार कोटी रुपये असण्याची शक्यता आहे, असे CAIT ने म्हटले आहे.

तात्पुरती वैद्यकीय शिबिरे, आयुर्वेदिक उत्पादने आणि औषधांमधून 3 हजार कोटींचा महसूल गोळा होईल. तर ई-तिकीटिंग, डिजिटल पेमेंट, वाय-फाय सेवा आणि मोबाइल चार्जिंग स्टेशन यासारख्या क्षेत्रांचा व्यवसाय 1 हजार कोटींचा होण्याची अपेक्षा आहे. जाहिराती आणि प्रचारात्मक उपक्रमांसह मनोरंजन आणि माध्यमांचा व्यापार 10 हजार कोटी रुपयांचा होण्याची अपेक्षा आहे, असे CAIT ने म्हटले आहे.

महाकुंभमेळा 2025

12 वर्षांत चार वेळा साजरा केला जाणारा हा कुंभमेळा भारतातील चार पवित्र स्थळांमध्ये पार पडतो. यामध्ये गंगेच्या काठावरील हरिद्वार (उत्तराखंड), शिप्रा नदीकाठी असणारं उज्जैन (मध्य प्रदेश), गोदावरी नदीकाठी वसलेलं नाशिक (महाराष्ट्र) आणि गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या संगमावर प्रयागराज ही ठिकाणं आहेत. 

प्रत्येक घटना सूर्य, चंद्र आणि गुरूच्या विशिष्ट ज्योतिषीय स्थितींशी जुळते आणि हिंदू धर्मातील सर्वात पवित्र काळ आहे. महिनाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात लाखो भाविक, यात्रेकरु नदीत डुबकी मारतात. या पवित्र स्नान विधी, ज्यांना शाही स्नान किंवा अमृत स्नान असेही म्हणतात, त्यांच्या आत्म्याला शुद्ध करतात आणि त्यांची पापे धुतात असे मानले जाते.

14 जानेवारी, म्हणजे मकर संक्रांती (पहिले शाही स्नान), 29 जानेवारी - मौनी अमावस्या (दुसरे शाही स्नान), 3 फेब्रुवारी - वसंत पंचमी (तिसरे शाही स्नान), 12 फेब्रुवारी - माघी पौर्णिमा आणि 26 फेब्रुवारी - महाशिवरात्री (अंतिम स्नान) या दिवशी येथे सर्वाधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. 

कशी आहे तयारी?

यावर्षी, महाकुंभमेळ्यात पर्यटकांसाठी सुमारे 1,50,000 तंबू, 3000 स्वयंपाकघरे, 1,45,000 स्वच्छतागृहं आणि 99 पार्किंग लॉट आहेत. 40 हजारांहून अधिक पोलिस अधिकारी सुरक्षा आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी तैनात आहेत. 

सतत देखरेख ठेवण्याच्या हेतूने कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या एआय क्षमतेने सुसज्ज पाळत ठेवणारे कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत. भारतीय रेल्वेने प्रयागराजला नियमित सेवा देण्याव्यतिरिक्त, भाविकांना घेऊन जाण्यासाठी 100 गाड्या जोडल्या आहेत, ज्या 3330 फेऱ्या मारतील. 

केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या मते, 15 लाखांहून अधिक परदेशी पर्यटक महाकुंभाला भेट देण्याची अपेक्षा आहे. पर्यटन मंत्रालयाने आयुर्वेद, योग आणि पंचकर्म यासारख्या सुविधा देणारे तंबू शहर स्थापन केले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.