21 व्या वर्षी सोडलं क्रिकेट, आता जय शाहांच्या जागी बनले नवे BCCI सचिव; कोण आहेत देवजीत सैकिया?

BCCI New Secretary : बीसीसीआयच्या झालेल्या बैठकीत देवजित सैकिया यांची बीसीसीआयचे नवीन सचिव म्हणून निवड करण्यात आली, तर कोषाध्यक्ष म्हणून प्रभतेज सिंग भाटिया यांची निवड झाली आहे. 

पुजा पवार | Updated: Jan 13, 2025, 02:15 PM IST
21 व्या वर्षी सोडलं क्रिकेट, आता जय शाहांच्या जागी बनले नवे BCCI सचिव; कोण आहेत देवजीत सैकिया? title=
(Photo Credit : Social Media)

BCCI New Secretary : बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह (Jay Shah) हे आयसीसीचे अध्यक्ष झाल्यावर बीसीसीआयच्या सचिव पदी कोणाची नेमणूक होणार याविषयी बरीच चर्चा होती. रविवारी मुंबईत बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. जय शहा हे आयसीसीचे अध्यक्ष झाल्यावर तर आशिष शेलार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर बीसीसीआय सचिव आणि कोषाध्यक्ष ही दोन पदे रिक्त होती. बीसीसीआयच्या झालेल्या बैठकीत देवजित सैकिया (Devajit Saikia) यांची बीसीसीआयचे नवीन सचिव म्हणून निवड करण्यात आली, तर कोषाध्यक्ष म्हणून प्रभतेज सिंग भाटिया यांची निवड झाली आहे. 

12 जानेवारी रोजी देवजीत सैकिया यांची भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) च्या सचिव पदावर नेमणूक करण्यात आली. देवजीत सैकिया हे आसामसाठी रणजी ट्रॉफीमध्ये विकेटकिपर फलंदाज म्हणून खेळले आहेत.  देवजीत सैकिया हे पेशाने वकील असून ते यापूर्वी त्यांनी आसाम क्रिकेट असोसिएशनमध्ये सचिव म्हणून काम केले आहे. 55 वर्षीय देवजीत सैकिया यांनी बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह यांची जागा घेतली.

21 व्या वर्षी सोडलं क्रिकेट: 

इंडियन एक्स्प्रेसच्या एका रिपोर्टनुसार देवजीत सैकिया हे पुढील 10 महिन्यांसाठी बीसीसीआयचे सचिव असतील. सैकियाने 1991 मध्ये आसामसाठी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले होते. विकेटकीपर आणि मिडिल आर्डर फलंदाज म्हणून त्यांनी 4 सामने खेळले. परंतु 21 वर्षांचे असताना त्यांनी क्रिकेट सोडलं आणि वेगळी वाट धरली. सैकिया यांची आसाम राज्याचे वरिष्ठ स्थायी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आसाम सरकारचे प्रतिनिधित्व केले. क्रिकेट संघटनांशिवाय इतर क्रीडा संघटनांचाही ते कारभार पाहतात. सैकिया115 वर्षीय गुवाहाटी टाऊन क्लब आणि गुवाहाटी स्पोर्ट्सचे सचिव देखील आहेत.
आसाम क्रिकेट असोसिएशनने रविवारी बीसीसीआय नवे सचिव झाल्याबद्दल देवजीत सैकिया यांचे अभिनंदन करत आनंद व्यक्त केला. तसेच त्यांच्या अनुभवामुळे देशात खेळाला आणखी प्रोत्साहन मिळेल असे म्हटले. 

हेही वाचा : IPL 2025 सुरु होण्याची तारीख ठरली! 'या' दिवशी होणार पहिली मॅच, BCCI ने दिली माहिती

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी केव्हा जाहीर होणार भारतीय संघ? 

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 येत्या 19 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. तर याचा शेवटचा सामना हा 9 मार्च रोजी खेळवण्यात येईल. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व देशांना 12 जानेवारी पर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्याची मुदत देण्यात आलेली होती. मात्र बीसीसीआयने आयसीसीकडे ही मुदत वाढवून मागितली असून राजीव शुक्ला यांच्या माहितीनुसार बीसीसीआय 19 जानेवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करेल.