Roger Federer Singing Video : टेनिस स्टार रॉजर फेडरर यानं गेली काही दशकं या खेळात उत्तुंग शिखर गाठलं आणि बऱ्याच ग्रँड स्लॅमवर आपलं नाव कोरलं. अतिशय सुरेख अशा या खेळात रॉजर फेडररनं फार कमी वयापासूनच पदार्पण केलं आणि तिथूनच त्याच्या यशाचा मार्ग खुला झाला. विम्बल्डन आणि फेडररचंही खास नातं. या स्पर्धेत त्यानं बऱ्याचदा जेतेपद मिळवलं आणि टेनिस जगतातला हा लखलखता तारा अनेक नवोदित खेळाडूंसाठी आदर्श ठरला.
सध्या मात्र फेडरर टेनिसमध्ये सक्रिय नाही. असं असलं तरीही तो या खेळाशी मात्र आजही जोडला गेला आहे. नुकतीच यंदाच्या वर्षीच्या Wimbledon स्पर्धेला सुरुवात झाली. 8 वेळा विम्बल्डनचं जेतेपद मिळवणारा फेडरर या स्पर्धेत खेळणार नसल्याची ही पहिलीच वेळ. असं असलं तरीही 20 ग्रँडस्लॅम मिळवणारा हा खेळाडू सध्या मात्र त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अगदी मनमुरादपणे जगताना दिसतोय.
टेनिस कोर्ट, विम्बल्डनचं सेंटर कोर्ट गाजवणारा फेडरर नुकताच एका जगप्रसिद्ध बँडमधूनही गातना दिसला. झुरिक येथे रविवारी एका कॉन्सर्टदरम्यान Coldplay या बँडच्या लीड वोकलिस्ट अर्थात मुख्य गायक क्रिस मार्टिन याच्यासोबत फेडरर स्टेजवर गाणं गाताना दिसला.
आपल्या जीवनातील या अनुभवाविषयी फेडररनं एक ट्विट केलं. Adventure of a Lifetime असं टाईप करत त्यानं या क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. जिथं एका बँडसोबत वावरताना फेडररही मनमुराद आनंद लुटताना दिसता. किंबहुना तोसुद्धा या बँडचाच एक भाग असल्याचं यावेळी भासत होतं. त्यानं हा व्हिडीओ आणि फोटो शेअर करताक्षणीच जगभरातील चाहत्यांनी फेडररच्या या नव्या इनिंगला दाद देत त्याचं कौतुक केलं. त्याला या वेगळ्या रुपात पाहणं अनेकांसाठीच परवणी ठरली.
Adventure of a Lifetime pic.twitter.com/zy78pCG6u3
— Roger Federer (@rogerfederer) July 3, 2023
'वन हँडेड बॅकहँडपासूनस कोल्डप्लेसोबत गाण्यापर्यंत, आपणही याच्यासोबत दूरचा प्रवास केलाय', 'तू या बँडला विम्बल्डनमध्ये आणू शकतोस का?', 'रॉजर फेडरर सगळ्यातच अव्वल' या आणि अशा असंख्य कमेंट फेडररच्या या खास पोस्टवर पाहायला मिळाल्या. ज्या निमित्तानं क्रीडाप्रेमींचं त्याच्यासोबत असणारं अव्यक्त नातंही पुन्हा नव्या रुपात समोर आलं.