Pro Kabaddi League: पुणेरी पलटणची झुंज अपयशी, युपी योद्धाजने मिळवला 36-33 असा विजय

UP Yoddhas Vs Puneri Paltan: निर्णायक क्षणी पुणेरी पलटणच्य खेळाडूंचा जौर कमी पडला आणि अखेपर्यंत संघर्ष करुनही पुणेरी पलटणचा पराभव झाला आहे. 

तेजश्री गायकवाड | Updated: Dec 8, 2024, 07:57 AM IST
Pro Kabaddi League: पुणेरी पलटणची झुंज अपयशी, युपी योद्धाजने मिळवला 36-33 असा विजय title=

UP Yoddhas Win against Puneri Paltan in PKL 11: प्रो कबड्डी लीगच्या तिसऱ्या अखेरच्या टप्प्यात घरच्या मैदानावर सलग दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटणला पराभवाचा सामना करावा लागला. गगन गौडाच्या चौफेर चढायांनी पुणेरी पलटणचा बचाव खिळखिळा केला होता. मात्र, उत्तरार्धात पंकज मोहितेच्या चढायांनी पलटणचे आव्हान राखले होते. मात्र, निर्णायक क्षणी पलटणच्य खेळाडूंचा जौर कमी पडला आणि युपी योद्धाजने 36-33 असा विजय मिळवून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.

बालेवाडीमध्ये रंगला सामना 

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत पूर्वार्धात युपीच्या खेळाडूंनी बचाव आणि आघाडीच्या जोरावर चांगलाच जोर धरला होता. त्याच जोरावर मध्यंतराला मिळविलेली 21-11  ही मोठी आघाडी त्यांच्यासाठी निर्णायक ठरली. गगन गौडाने पुन्हा एकदा आपली जोश दाखवून उत्तरार्धात तब्बल तीनवेळा संघावरील लोणची नामुष्की टाळली हाच सामन्याचा निर्णायक क्षण ठरला. पलटणने उत्तरार्धात युपी संघावर लोण चढवला असला, तरी त्यापूर्वी तीन वेळा त्यांनी ही संधी चुकवली. यामुळेच त्यांना लोण मिळवूनही 34-29 असे पिछाडीवर रहावे लागले. गगनने 15, तर भवानी राजपूतने 6 गुणांची कमाई केली. पुणेरी पलटणकडून पंकज मोहितेने 11 गुणांची कमाई करून एकाकी लढत दिली. मोहित गोयतला 7 गुण मिळवता आले.

उत्तरार्धात पुणेरी पालटणे लावला जोर 

उत्तरार्धात पुणेरी पलटणने बचावात जोर धरताना आपले आव्हान राखण्याचा प्रयत्न केला. मोहित गोयतने दादासाहेबच्यासाथीत गगन गौडाची अव्वल पकड करत चुणूक दाखवली. त्यानंतर आकाश, पंकजने चढाईत जोर दाखवत पलटणची पलटवार करण्याची तयारी दाखवली होती. लय गवसलेल्या पंकज मोहितने एका चढाईत दोन गुणांची कमाई करत युपी योद्धाजला लोणच्या उंबरठ्यावर आणले. मात्र, युपीकडे केवळ केशव कुमार असताना त्याला पकडण्याची घाई करत गौरवने आपला बळी दिला. उत्तरार्धाचा पहिला टप्पा संपताना पलटणने मध्यंतराची 10 गुणांची पिछाडी भरुन काढताना स्थिती 27-22 अशी आणली होती.

ही गमावलेली संधी पलटणला महागात पडली. गगनने संधी मिळाल्यावर एका चढाईत दोन गुणांची कमाई करत युपीची आघाडी पुन्हा वाढवली. अखेर तीन प्रयत्न हुकल्यानंतर पाच मिनिट बाकी असताना पलटणला युपी संघावर लोण चढविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. तेव्हा गुणस्थिती युपीच्या बाजूने 34-29 अशी राहिली होती. पण, त्यानंतर युपीच्या चढाईपटूंनी वेळ काढूपणा काढताना आघाडी कायम राखली आणि पलटणचे विजयाचे मनसुबे उधळून लावले.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by UP Yoddhas (@upyoddhas)

 

पूर्वार्धात कसा झाला खेळ?

पूर्वार्धात पुणेरी पलटण संघाला आघाडी, बचाव अशा दोन्ही आघाड्यावर अपयश आले. पलटणच्या बचावफळीवर गगन दौडाने दडपण आणले, तर सुमित आणि हितेशने पलटणच्या चढाईपटूंची कोंडी केली. अधून मधून भवानी राजपूतच्या चढायांचीही साथ गगनला मिळत होती. पलटणसाठी मात्र आकाश शिंदे, पंकज मोहिते, मोहित गोयत यापैकी एकही प्रमुख चढाईपटू चमक दाखवू शकत नव्हता. कर्णधार आकाश सहा चढाईत ४ वेळा बाद झाला. त्याला केवळ एकच गुण मिळवता आला होता. मोहितच्या नावावरही ८ चढायांत केवळ ३ गुण होते. अशा सगळ्या दडपणाच्या परिस्थितीत १२व्या मिनिटाला पुणेरी पलटणला लोण सहन करावा लागला. एकूणच सुरुवातीपासून पिछाडीवर राहिलेल्या पलटणची मध्यंतराला २१-११ अशी कठिण परिस्थिती होती.