वडिलांनी घरोघरी सिलिंडर पोहोचवून मुलाला घडवलं, आता आयपीएलमध्ये आहे स्टार खेळाडू

आयपीएलमधल्या या स्टार खेळाडूची संघर्षमय कहाणी प्रत्येक मुलासाठी बनलीय प्रेरणादायी कहाणी

Updated: May 4, 2022, 10:19 PM IST
वडिलांनी घरोघरी सिलिंडर पोहोचवून मुलाला घडवलं, आता आयपीएलमध्ये आहे स्टार खेळाडू title=

IPL 2022 : आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals)झालेल्या सामन्यात एका खेळाडूंने सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं. हा खेळाडू आतापर्यंत फारसा चर्चेत नव्हता पण त्या एका सामन्याने घराघरात त्याची ओळख निर्माण झाली आहे. हा खेळाडू आहे कोलकाता नाईट रायडर्सचा मॅच विनर रिंकू सिंग (Rinku Singh). 

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात रिंकूने 38 बॉलमध्ये नाबाद 42 धावा करत टीमला शानदार विजय मिळवून दिला. त्याने नितिश राणाबरोबर नाबाद पार्टनरशिप केली. रिंकूच्या या खेळीची सध्या चांगलीच चर्चा होतेय. 

आयपीएलमध्ये (IPL) आज रिंकू सिंगने स्वत:ची ओळख निर्माण केली असली तरी हा प्रवास इतका सोपा नव्हता. रिंकूच्या यशामागे त्याची आणि त्याच्या कुटुंबियांनी कठोर मेहनत आहे. त्याच्या संघर्षाची कहाणी प्रत्येक मुलासाठी प्रेरणादायी अशीच आहे. 

रिंकूच्या यशामागे वडिलांचा संघर्ष
रिंकूचे वडिल एका गॅस कंपनीत कामाला होते, उन-पावसात खांद्यावर सिलिंडर ठेवून घरोघरी पोहचवण्याचं काम ते करत होते. पण आपल्या मुलासाठी त्यांनी कोणत्याच गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. मुलाला क्रिकेट खेळता यावं यासाठी त्यांनी कठोर मेहनत केली. रिंकूनेही आपल्या वडिलांची मेहनत वाया जाऊ दिली नाही.

रिंकूचा अलीगड ते आयपीएलपर्यंतचा प्रवास 
रिंकू सिंग एका छोट्या शहरातून आयपीएलपर्यंत पोहचला आहे. आयपीएलमध्ये राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या शानदार फलंदाजीने संघाला विजय तर मिळवून दिलाच पण सामनावीराचा किताबही पटकावला. 

रिंकूला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड
सिंग यांना एकूण पाच मुलं त्यातला रिंकू हा तीन नंबरचा मुलगा. लहानपणापासूनच त्याला क्रिकेटची आवड होती. एकवेळ अशी होती की रिंकूच्या अभ्यासासाठीही त्याच्या वडिलांकडे पैसे नव्हते. रिंकूलाही अभ्यासात फारसा रस नव्हता. बराचवेळा तो अभ्यास सोडून क्रिकेट खेळायला जात असे. यावर आई-वडिलांचा ओरडाही खावा लागत असे.

स्टेडिअमपर्यंत जाण्यासाठी वडिलांनी दिली मोटारसायकल
रिंकूची क्रिकेटसाठीची आवड पाहता, कालांतराने कुटुंबियांनीही त्याला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. त्यानंतर रिंकूने आपलं सर्व लक्ष क्रिकेटकडे केंद्रित केलं. स्टेडिअमपर्यंत जाण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला मोटारसायकलही घेऊन दिली होती. रिंकू सिंगने कठोर मेहनत करत स्थानिक क्रिकेटमध्ये नाव कमावलं. आणि आज त्याच जोरावर त्याने आयपीएलमध्ये आपली छाप उमटवली आहे.