जम्मू काश्मीरमध्ये रहस्यमयी आजाराचं थैमान; 17 बळी गेल्यानं केंद्रीय आरोग्य यंत्रणेलाही हादरा

Jammu and Kashmir : देशातील पर्यटकांमध्ये कमालीच्या लोकप्रिय असणाऱ्या जम्मू काश्मीर क्षेत्रामध्ये एका रहस्यमयी आणि विचित्र आजाराचं सावट पाहायला मिळत आहे.   

सायली पाटील | Updated: Jan 20, 2025, 10:01 AM IST
जम्मू काश्मीरमध्ये रहस्यमयी आजाराचं थैमान; 17 बळी गेल्यानं केंद्रीय आरोग्य यंत्रणेलाही हादरा  title=
jammu and kashmir Rajouri 17 Mysterious Deaths Central Team Reach From Delhi To J and K For Investigation

Jammu and Kashmir News : चहूबाजूंनी बर्फ, पर्यटकांची गर्दी अशा एकंदर वातावरणाचीच चर्चा असणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये सध्या एका दहशतीचं सावटही पाहायला मिळत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे एका विचित्र आजारानं घातलेलं थैमान. आतापर्यंत इथं या रहस्यमयी आजारानं 17 जणांचा बळी घेतला आहे. 

प्राथमिक माहितीनुसार यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. J&K च्या राजौरीमध्ये हा आजार पसरला असून त्याचं निदान करण्यासाठी आता दिल्लीतील एक पथक काश्मिरमध्ये दाखल झालं आहे. ज्या भागात हा आजार पसरला आहे त्या भागातील विहीर या पथकां सील केलीये. या विचित्र आजारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

जम्मूमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाचे मुख्याध्यापक डॉ. आशुतोष गुप्ता यांनी इथं या आजारामुळं झालेल्या मृत्यूंच्या वृत्ताला दुजोरा देत परिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं. या भागात मोहम्मद असलम या इसमानं एका आठवड्याभरात चार मुली आणि दोन मुलं गमावली. याशिवाय मामा आणि मावशीलाही गमावलं असं सांगत त्यांनी वस्तुस्थिती यंत्रणांसह माध्यमांपुढे मांडली. 

दरम्यान, शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजौरी जिल्ह्यातील एका गावाचा दौरा करण्यासाठी एच उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. शुक्रवारी खुद्द जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीसुद्धा या गावाचं निरीक्षण करत राज्यातील आरोग्य विभागाला तपासणीमध्ये वेग आणण्याच्या सूचना केल्या. 

तापासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार प्रभावित क्षेत्रातील 3000 हून अधिक स्थानिकांच्या घरी जात सर्वेक्षण करण्यात आलं. ज्यामध्ये पाणी, अन्नपदार्थ आणि इतर सामग्रीचेही नमुने चाचणीसाठी घेण्यात आले. या नमुन्यांमध्ये न्यूरोटॉक्सिनचा अंश सापडल्याची बाब लक्षात येताच इथं एसआयटी स्थापन करण्यात आली.

हेसुद्धा वाचा : बापरे! मुंबईकर इतक्या मोठ्या संकटासह जगतायत? नागरिकांच्या सर्दी, खोकल्यामागचं नेमकं कारण चिंता वाढवणारं  

प्रभावित क्षेत्रातील तीन घरांसह एक विहीरही सील करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार इथं झऱ्यांच्या पाण्यामध्ये किटकनाशकंही आढळली असून, इथं आता विहीरीपाशीसुद्धा दोन ते तीन जवान तैनात केले जाणार आहेत. पुढील आदेश येईपर्यंत या विहीरीतील पाण्याचा वापर न करण्याचे स्पष्ट आदेश इथं प्रशासनानं जारी केले आहेत.