Mumbai News : मुंबईत पावसाळ्यादरम्यान सहसा साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. पण, सध्या मात्र शहरात वेगळंच चित्र पाहायला मिळत असून, पावसाळा नसतानाही नागरिकांमध्ये हिवताप अर्थात मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुन्या यांसारखे आजार फोफावताना दिसत आहेत.
अधिकृत आकडेवारीनुसार वर्षाच्या सुरुवातीलाच, जानेवारी महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यामध्ये राज्यात वरील आजारांचा प्रादुर्भाव दिसून आला. सध्या राज्यात मलेरिया/ हिवतापाचे 401, डेंग्यूचे 210 आणि चिकुनगुन्याचे 130 रुग्ण आढळल्याचं सांगितलं जात आहे.
साधारणपणे मुंबईत पावसाळ्यादरम्यान मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचे रुग्ण आढळतात. पण, गेल्या काही वर्षांमध्ये मात्र हे चित्र बदललं असून, सातत्यानं कमीजास्त प्रमाणात अशा रुग्णांची नोंद आरोग्य विभागामार्फत केली जात आहे.
प्राथमिक स्वरुपात शहरात सुरु असणारी अगणित बांधकामं यामागचं प्रमुख कारण असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईमध्ये विविध भागांत मोठ्या प्रमाणात बांधकामं सुरू आहेत. जिथंजिथं बांधकामं सुरू आहेत त्या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा न झाल्याने तिथं डासांची उत्पत्ती आणि वाढ होत आहे. त्यामुळेच मुंबईमध्ये मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याची माहिती सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या वतीनं माध्यमांना देण्यात आली आहे.
फक्त बांधकामंच नव्हे, तर वातावरणात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या बदलांमुळे त्याचा थेट परिणाम ऋतुचक्रावर दिसत आहे. ज्यात बांधकाम प्रकल्पांची भर पडत असून, धुरक्यासम परिस्थिती उदभवत यामुळं हिवताप, डेंग्यू यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याचं कारण तज्ज्ञांनी पुढे केलं आहे.
राज्यातील हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्याच्या साथीला प्रतिबंध घालण्यासाठी म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागाकडून रुग्ण सापडलेल्या परिसरात सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. जिथं रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांच्यावर लक्षणांनुसार उपचार सुरू करण्यात येत आहेत. आरोग्य विभागानंच यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत जानेवारीत चिकुनगुन्याच्या रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली असून, सर्वाधिक रुग्ण हे अकोल्यात आहेत. हा आकडा 35 इतका असून, त्यामागोमाग मुंबईत 19 रुग्ण तर, साताऱ्यात 17 रुग्ण सापडले आहेत.