Saif Ali Khan attacked in Mumbai: सैफ अली खान हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी हा बांगलादेशी नागरिक असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मोहम्मद शरीफुल शहजाद असं आरोपीचे नाव असून तो बांगालादेशात कुस्तीचा खेळाडू असल्याचे समोर आले आहे. त्याच कुस्तीच्या डावपेचातून त्याने सैफवर हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मोहम्मद शरीफुल शहजाद याला लहानपणापासून कुस्ती खेळण्याची हौस होती. तो त्याच्या वस्तीत कुस्ती खेळायचा. तसंच, कुस्तीच्या काही सामन्यातही त्याने भाग घेतला होता. याच कारणामुळं त्याची शरीरयष्टी कणखर होती. जेव्हा त्याने सैफच्या घरातील महिला कर्मचारी लीमावर हल्ला केला तेव्हा सैफने आरोपीच्या कमरेला पकडून त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र येथे त्याने कुस्तीचे डावपेच आखून सैफचा हल्ला परतवला आणि पाठीमागून त्याच्या गळ्यावर वार केले. नंतर त्याच्या पाठीत चाकूने वार केला. ज्यामुळं चाकुचा एक हिस्सा तुटला.
पोलिसांच्या चौकशीत आरोपीने खुलासा केला आहे की, काही दिवसांपूर्वी तो वांद्रे परिसरात रिक्षात प्रवास करत होता. तेव्हा रिक्षा चालकाने त्याला सांगितले की, वांद्रे परिसरात मोठे मोठे बिझनेसमन आणि पैसेवाले लोक राहतात. त्या दिवसापासूनच त्याने या परिसरात चोरी करण्याचा प्लान बनवला. तसंच, त्याने सैफ अली खानच्या बिल्डिंगची निवड यासाठी केली की, इमारती खाली लॉन होता ज्यामुळं इमारतीत चढताना खाली पडला तरी जास्त इजा होणार नाही.
सैफ अली खानच्या घरात घुसण्याआधी आरोपीने अन्य काही सेलिब्रिटींच्या घरांची रेकी केली होती का? याचा तपास पोलिस करत आहेत. तसंच, आरोपी 1 कोटींची रक्कम चोरी करण्याच्या हेतूने सैफच्या घरी गेला होता. तसंच, सैफच्या महिला मदतनीसानेदेखील आरोपीने एक कोटींची रक्कम मागितल्याचं जबाबात म्हटलं होतं. आरोपी 1 कोटींची रक्कम घेऊन बांगलादेशात जाण्याच्या तयारीत होता, असा पोलिसांचा अंदाज आहे.
पोलीस सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेचं रिक्रिएशन करण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला पुन्हा एकदा सैफ अली खानच्या घरात घेऊन जाऊ शकतात. त्या ठिकाणी जाऊन पोलीस शहजाद याच्याकडून हल्ल्याचा सिन रिक्रिएट करून घेण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास हल्लेखोर पुन्हा एकदा सैफ अली खानच्या घरात जाणार आहे. तसेच हल्ला कसा केला हे सांगणार आहे.