India vs Australia 1st T20I: भारतीय संघाने वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यातील वचपा टी-20 मालिकेमधील पहिल्याच सामन्यात काढला आहे. भारताने विशाखापट्टणम येथे गुरुवारी झालेल्या सामन्यात 2 विकेट्स आणि 1 चेंडू राखून विजय मिळवला. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने उत्तम फलंदाजी करत 3 गड्यांच्या मोबदल्यात 208 धावांचा डोंगर उभा केला. भारतीय संघाने या धावसंख्येचा पाठलाग करताना इशान किशन आणि सूर्यकुमार यादवच्या दमदार खेळीबरोबरच रिंकू सिंगच्या उत्तम फिनिशिंगच्या जोरावर सामना जिंकला. भारताने 19.5 ओव्हरमध्ये आठ गडी गमावून 209 धावांचं लक्ष गाठलं.
भारताला शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 7 धावा हव्या होत्या. मात्र या ओव्हरमध्ये भारताने तब्बल 3 विकेट्स गमावल्या. तरीही शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना भारत विजयी घोषित झाल्यानंतर 1 चेंडू शिल्लक असतानाच जिंकल्याचं स्पष्ट झालं. सेन बोटने टाकलेली शेवटची ओव्हर फारच रोमहर्षक झाली.
सेन अबोटच्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर रिंकू सिंहने चौकार लगावला. पुढल्या चेंडूवर रिंकूने 1 धावा लेग बाय म्हणून पळून काढली. ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर सेन अबोटने अक्षर पटेलला झेलबाद केलं. 3 बॉलमध्ये 2 धावा हव्या असताना रवी बिश्नोई फलंदाजीसाठी आला. सामन्यातील चौथ्या चेंडूवर रवी बिश्नोई धावबाद झाला. रन काढताना विकेट पडल्याने रिंकू फलंदाजीला आला. पाचव्या चेंडूवर 2 धावा काढण्याच्या नादात अशरदीप सिंग धावबाद झाला. मात्र भारताला एक धाव मिळाली. शेवटच्या बॉलवर भारताला 1 धाव हवी असताना सेन अबॉटने टाकलेला चेंडू रिंकू सिंहने सिक्स मारला. मात्र त्याने सिक्स मारुनही त्याला 6 धावा मिळाल्या नाहीत. क्रिकेटच्या नियमानुसार विजयासाठी हवी असलेली एक धाव ही नो बॉलची ग्राह्य धरण्यात आली. ज्या टप्प्यात घटना घडल्या त्यानुसार नो बॉल हा षटकार लगावण्याच्या आधी टाकण्यात आला. त्यामुळे नो बॉलची एक धाव आधी झाली असं ग्राह्य धरलं गेलं. एका धावेसहीत भारताने सामना जिंकल्याने रिंकूचा षटकार ग्राह्य धरला गेला नाही आणि त्याच्या खात्यात त्या 6 धावा जमा झाल्या नाहीत.
19.1 - रिंकूचा चौकार
19.2 - रिंकूने एक धाव घेतली (लेग बाय)
19.3 - अक्षर पटेल बाद
19.4 - रवी बिश्नोई बाद
19.5 - दुसरी धाव घेताना अर्शदीप सिंग बाद
19.5- रिंकूचा भन्नाट सिक्स पण नो बॉल असल्याने एकच धाव ग्राह्य धरली अन् 6 धावा नाकारल्या.
Rinku Singh finisher, six on the last ball, India wins India needed 1 run on 1 ball and hit a six. #RinkuSingh pic.twitter.com/C2Wc6NpIrw
— Sudhir Kumar Chaudhary (@Sudhirsachinfan) November 24, 2023
सूर्यकुमारने 190.48 च्या स्ट्राइक रेटने 42 बॉलमध्ये 80 धावा करत भारताचा विजय सुखकर झाला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारताचा हा पहिलाच सामना होता. पुढील सामना 26 तारखेला होणार आहे.