मुंबई : शिवसेना-भाजपमधला तिढा अखेर सुटला असून, महाराष्ट्रात पुन्हा एकदा युतीचे सरकार सत्तेवर येणार आहे. शिवसेनेनं सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतलाय. तब्बल ७० दिवसानंतर पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकत्र आलेत.
शिवसेनेला सरकारमध्ये १२ मंत्रीपदे देण्यात येणार असून, त्यामध्ये ५ कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश असणार आहे. पण, या निर्णयामुळे मंत्रिपदावरून शिवसेनेत असंतोष निर्माण झालेला दिसतोय. मंत्रिपदांसाठी चर्चेत असणाऱ्या नावांत मुंबईला झुकतं माप देतानाच ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष? केल्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केलीय.
दरम्यान, सरकार युतीचे असले तरी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद असणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं. तर महाराष्ट्र सुखी आणि समृद्ध करण्यासाठी युती झाल्याचं शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितलंय.
विधानसभा निवडणुकीत ज्या शिवसेनेच्या विरोधात लढले, त्या शिवसेनेला भाजपनं सरकारमध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतलाय. मात्र जे भाजपसोबत खांद्याला खांदा भिडवून निवडणूक लढले, ते राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम हे मित्रपक्ष सरकारमध्ये सहभागी होणार की नाही, ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मित्रपक्षांना सामावून घेण्याबाबत आज रात्रीपर्यंत निर्णय होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.