मुंबई : शिवसेना-भाजपमधला तिढा अखेर सुटला असून, महाराष्ट्रात पुन्हा एकदा युतीचे सरकार सत्तेवर येणार आहे. शिवसेनेनं सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय.
तब्बल ७० दिवसानंतर पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकत्र आलेत. शिवसेनेला सरकारमध्ये १२ मंत्रीपदे देण्यात येणार असून, त्यामध्ये ५ कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश असणार आहे. मात्र सरकार युतीचे असले तरी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद असणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं.
शिवसेना-भाजपची संयुक्त पत्रकार परिषद सह्याद्री अतिथी गृहावर झाली.यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, अनिल देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम एकनाथ शिंदे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे हे उपस्थित होते.
शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे सरकार स्थापन करावे, असा जनादेश आहे. त्या जनादेशाचा आदर राखत शिवसेनेसोबत युती करून सरकार चालविण्याचा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचेवळीमहाराष्ट्र सुखी आणि समृद्ध करण्यासाठी युती झाल्याचं शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितलं.शिवसेना-भाजपचं पुन्हा मनोमिलन झालंय. निवडणुकीपूर्वी दुरावलेली शिवसेना-भाजप ७० दिवसानंतर पुन्हा एकत्र आलेत.
महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही युतीनेच लढण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. दोन्ही पक्षांमध्ये समन्वय राखण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जागावाटप निश्चित करण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या समितीमध्ये दोन्ही पक्षातील नेते असतील, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
शिवसेना आणि भाजपची युती ही विचारांवर आधारित आहे. दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे सरकार चालवले पाहिजे, अशी जनभावना आहे. राज्यातील जनतेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्याविरोधात कौल दिला आहे. त्याचा आदर आम्ही राखला पाहिजे. मध्यंतरीच्या काळात सर्व गोष्टींवर निर्णय होऊ शकले नाहीत. त्यामुळेच भाजपने सरकार स्थापन केले, असे मुख्यमंत्री सांगितले.
मात्र, शिवसेनेला सोबत घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत होतो. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांना यासाठी सर्वाधिकार देण्यात आले होते. या दोघांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन युतीबाबत विस्तृत आराखडा तयार केला. त्यानंतर मी स्वतः उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला, असे मुख्यमंत्री फडणवीस स्पष्ट केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.