मुंबई: शिवसेना आणि भाजप यांच्या संसारात पुन्हा एकदा विघ्न आलंय... कालपर्यंत शिवसेनेसमोर वाकून असलेली 'कमळाबाई'... आता लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर एकदम 'कमळाभाई' बनलीय...
1985 सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची साथ सोडून, भाजप शरद पवारांच्या पुरोगामी लोकशाही दलात सामील झाला. तेव्हा बाळासाहेबांनी भाजपला 'कमळाबाई' असा टोला हाणला होता. त्यानंतर जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा बाळासाहेब भाजपला कमळाबाई असा चिमटा काढायचे... बिच्चारे भाजपचे नेते, महाराष्ट्रात शिवसेनेच्या अंगाखांद्यावर पक्ष वाढत असल्यानं तोंड दाबून हा बुक्क्याचा मार निमूट सहन करायचे. शिवसेना-भाजप युतीच्या संसारात या ना त्या कारणानं नेहमी भांड्याला भांडं लागायचं. आणि प्रत्येकवेळी भाजपचे नेते मातोश्रीवर धाव घेऊन बाळासाहेब ठाकरेंची मनधरणी करायचे... राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं काँग्रेसला दिलेला पाठिंबा असो, नाहीतर छोट्यामोठ्या कुरबुरी असोत, प्रत्येकवेळी कमळाबाईलाच नमतं घ्यावं लागलं. कमळाबाईच्या सोशिकपणामुळंच युतीचा तडजोडीचा संसार टिकला.
पण आता बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर भाजपचा पवित्रा 'शत प्रतिशत' बदललाय. महाराष्ट्रात धाकटा भाऊ असलेल्या भाजपला थोरल्या भावाची जागा घ्यायचीय. नरेंद्र मोदींच्या झंझावातामुळं गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशाची सत्ता काय मिळाली, भाजपची ताकद आणखीच वाढली. केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या अनंत गितेंना अवजड उद्योग हे काहीसं हलकं खातं देण्यात आलं. शिवसेनेनं आपली नाराजीही व्यक्त केली. पण मोदींनी खातं काही बदलून दिलं नाही. शेवटी चुपचाप मिळालेलं खातं पदरात घेण्याची पाळी शिवसेनेच्या वाघांवर आली.
आता तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कमळाबाईनं डोईवरचा पदरच काढून टाकलाय. हा पदर कमरेला खोचून, निम्म्या जागा देण्याची मागणी शिवसेनेकडं केलीय. अमित शाह यांच्यासारखा आक्रमक अध्यक्ष मिळाल्यानंतर कमळाबाई आता कमळाभाई बनलीय... पंतप्रधान मोदींनी आचारसंहिता लागू होण्याआधी महाराष्ट्रात विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला, मात्र शिवसेनेला या कार्यक्रमांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आलं. आता तर या कमळाभाईंना कंठही फुटलाय. 'अब महाराष्ट्र, सब महाराष्ट्र...' असा उखाणा घेत स्वबळावर महाराष्ट्र काबीज करण्याची स्वप्नं भाजप नेत्यांना पडतायत. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर, अमित शाह यांनी तसं सूतोवाच केलं होतंच...
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना, त्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला नकार देण्याचं धाडस शिवसेनाप्रमुख ठाकरेंनी दाखवलं होतं. वो भी क्या दिन थे.. असे सुस्कारे आता मातोश्री सोडतेय... कारण भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या मुंबई दौऱ्याच्या निमित्तानं 'मातोश्री'ला अगदीच झुकतं माप घ्यायला लावलं. बोलावणं आल्याशिवाय मातोश्रीवर जाणार नाही, अशी शहेनशाही भूमिका अमित शाहांनी घेतली. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा नाइलाज झाला. आणि बळेबळे का होईना, उद्धव ठाकरेंना अमित शाहांच्या भेटीसाठी निमंत्रण धाडावं लागलं. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, हे 'कमळाभाईं'नी सप्रमाण सिद्ध केलं....
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.