एमपीएससीत अमित शेडगे प्रथम

राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत साताऱ्याच्या अमित शेडगे यांनी बाजी मारत प्रथम येण्याचा मान पटकावला. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर मुंबईचा तेजस चव्हाण हा तेरावा आला आहे. त्याची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 14, 2013, 12:25 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत साताऱ्याच्या अमित शेडगे यांनी बाजी मारत प्रथम येण्याचा मान पटकावला. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर मुंबईचा तेजस चव्हाण हा तेरावा आला आहे. त्याची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली आहे.
एमपीएससी २०१२मधील मुख्य परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. सातारा जिल्ह्यातील गोडोलीचे अमित तानाजी शेडगे याने प्रथम क्रमांक पटकावला. विकास सूर्यवंशी आणि सतीश शितोळे यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. यशस्वी उमेदवारांमध्ये सात अपंग व्यक्तींचा समावेश आहे.
मागासवर्गीय उमेदवारांमधून जालना जिल्ह्यातील परतूरच्या अविशकुमार सोनोने पहिला क्रमांक पटकावलाय. महिला उमेदवारांत नम्रता चाटे अव्वल ठरल्या. या सर्वांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली. निवड झालेल्या उमेदवारांमध्ये ३६ इंजिनिअर, ६६ डॉक्‍टर आणि तब्बल १०८ जण पदव्युत्तर पदवीधारक आहेत.

राजपत्रित अधिकाऱ्यांच्या विविध पदांवर एकूण ३५९ उमेदवारांची निवड झाली. यापैकी २९० जण गट `अ`मधील आणि ६९ उमेदवार गट `ब`मधील अधिकारी आहेत. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, विक्रीकर उपायुक्त, जिल्हा उपनिबंधक, गटविकास अधिकारी, वित्त आणि लेखा अधिकारी, तहसीलदार आदी पदांचा यांत समावेश आहे.
अमित शेडगे कृषी पदवीधर असून सध्या नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. मागासवर्गीयांतून प्रथम आलेले अविशकुमार सोनोनेही कृषी पदवीधर असून विक्रीकर विभागात निरीक्षकपदावर कार्यरत आहेत. महिलांमधून प्रथम आलेल्या नम्रता चाटे कला शाखेच्या पदवीधर असून बीड जिल्ह्यातल्या केज गावच्या आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.