राज ठाकरेंचा यू-टर्न आणि मित्रपक्ष भाजपची टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या बाबतीत यू टर्न घेतल्याचे नाशिकमध्ये पडसाद उमटताना दिसतात. विरोधक तर दूरच मात्र मित्रपक्ष भाजपातूनही राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका होतेय. 

Updated: Aug 25, 2014, 11:39 PM IST
राज ठाकरेंचा यू-टर्न आणि मित्रपक्ष भाजपची टीका title=

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या बाबतीत यू टर्न घेतल्याचे नाशिकमध्ये पडसाद उमटताना दिसतात. विरोधक तर दूरच मात्र मित्रपक्ष भाजपातूनही राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका होतेय. 
 
महाराष्ट्र सुतासारखा सरळ करण्याची गर्जना करत राज ठाकरेंनी अडीच वर्षांपूर्वी नाशिककरांकडे मतांचा जोगवा मागितला. नाशिकरांनीही मनसे विश्वास ठेवत तब्बल ४० नगरसेवक निवडून दिले. 

नाशिककरांच्या विश्वासला तडा जाऊ देणार नाही, नाशिक शहराला दर आठ पंधरा दिवसांनी भेट देईन, नाशिकच्या विकासात स्वतः जातीनं लक्ष देईन, संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटेल असं मॉडेल शहर म्हणून नाशिकचा विकास करेन. अशा अनेक घोषणा राज ठाकरेंनी केल्या होत्या. 

मात्र अडीच वर्षांच्या काळात त्यातली एकही घोषणा पूर्ण झालेली दिसत नाही. ज्या गोदापार्कचं भांडवल केलं, तेही अडीच वर्षांपासून रखडलंय. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर विरोधक तर टीका करतायत पण सत्तेतला मित्रपक्ष असणा-या भाजपनंही उघड नाराजी व्यक्त करत राज ठाकरेंनी भ्रमनिरास केल्याचं म्हंटलय.

राज्यात मनसेच प्रथम महापौर होण्याचा मान मिळवणारे यतीन वाघ यांनी मात्र हे सगळे दावे खोडण्याचा कसोशीनं प्रयत्न केलाय. नाशिक महापालिकेत मनसेच्या कारभारावर नाशिककरांनीही नाराजी व्यक्त केलीय. 
 
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नावाचा आधार घेऊन  मनसेला आणि पर्यायानं राज ठाकरेंना नाशिककरांनी साफ नाकारलं. नागरिकांची मुलभूत कामं होत नसल्यानं तीन आमदार आणि ४० नगरसेवक निवडून देणा-या मनसेची विधानसभेसाठी नाशिकमधली वाटचाल बिकट दिसतेय. 

आता कुठल्या नव्या घोषणेसह राजसाहेब नाशिककरांपुढे येतात, यावर नाशिककरांचं आणि मनसेचं भवितव्य अवलंबून असणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.