नवी दिल्ली : नॅशनल हेराल्डप्रकरणी सुनावणीच्या मुद्यावरुन काँग्रेसचं जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी नवी दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयातून पतियाला हाऊस कोर्टाकडे रवाना झालेत.
भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोनिया आणि राहुल यांना कोर्टात हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलंय. भाजपा सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप करत काँग्रेसची देशभरात जोरदार निदर्शनं सुरू आहेत.
काँग्रेस मुख्यालय आणि कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमलेत. जमावाला आवरण्यासाठी या भागात मोठा पोलीस बंदोबस्त बघायला मिळतोय. पंतप्रधान मोदी आणि भाजपानं काँग्रेसला संपवण्याचा विडा उचलल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.
कोर्टात आणि रस्त्यावर ही लढाई सुरूच राहणार असल्याचं पक्षाच्या नेत्यांनी जाहीर केलंय.. मात्र सोनिया आणि राहुल गांधी अटक करून घेणार की जामीन मिळवणार, याचं गूढ आहे. काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी जामिनाचा पर्याय खुला असल्याचं म्हटलंय.