Chhagan Bhujbal Interview: कचऱ्यासारखं बाजूला करणं हे मनाला दु:ख देणारं आहे अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली आहे. तसंच मला मंत्रिपदाची शपथ देतील असं वाटलं होतं, मी त्या तयारीने नागपूरला गेलो होतो असा खुलासाही त्यांनी केला आहे. झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत छगन भुजबळ यांनी संपूर्ण घटनाक्रमच उलगडून सांगितला आहे.
"होळीच्या दिवशी मी आणि समीर नाशिकला निघालो होतो. अर्ध्या वाटेतून आम्हाला परत बोलावून घेतलं. दुपारी 1 ते 1.30 वाजता देवगिरीला अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल बसले होते. कशाला बोलावलं असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, काल दिल्लीत रात्री 3 पर्यंत बैठक सुरु होती. त्यात अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही होतो. तिथे प्रत्येक मतदारसंघाची चर्चा सुरु होती. नाशिक आल्यावर त्यांनी छगन भुजबळ उभे राहतील असं सांगितलं यावर एकनाथ शिंदे यांनी ही आमची जागा असल्याचं सांगितलं. त्यावर अमित शाह यांनी तिथे कोण आहे असं विचारलं. नाव सांगितलं असता आम्ही त्यांना समजावतो. ही जागा छगनऊभुजबळ यांच्यासाठी सोडायची आहे असं त्यांनी सांगितलं. मी म्हटलं ठीक आहे, राहतो उभा. बाहेर येऊन देवेंद्र फडणवीस यांना फोन केला असता त्यांनी तुमचं नाव अंतिम झालं असल्याचं म्हटलं. सगळे लोक माझ्यासोबत होते. मुस्लीम, आदिवासी, दलित, मराठा समाजाचे लोकही सोबत होते. व्यापारी, बिल्डरही आणखी सुधारणा होईल यासाठी पाठीशी होते सगळी सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली. पण तीन आठवडे झाले तरी नाव जाहीर करेनात, सगळी नावं जाहीर झाली, एक दोन राहिली होती तरी जाहीर करेनात. आता म्हटलं आपलं नाव काही जाहीर होत नाही. त्यानंतर म्हटंलं उगाच शहाणपणा न करता माघार घ्यावी. तुम्हाला तिकीट देत नाही यापेक्षा माघार घेतलेली बरी," असा खुलासा छगन भुजबळ यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, "sमाघार घ्यायची नव्हती तर अजित पवारांनी एक-दोन तासात भुजबळच उभे राहणार आहेत असं सांगायला हवं होतं. 10 दिवसांनी भुजबळांनी घाई केली असं सांगतात. त्याचा परिणाम मी त्यांना सांगितला होता. इतर जागांवर त्याचा परिमाण झाला".
"राज्यसभेची निवडणूक आली ती एक सीट आम्हाला मिळाली. मी म्हटलं मी तिथे जातो, आता 40 वर्षं झाली आहेत. तर ते सांगायला लागले की सुनेत्रा ताई पडल्या त्यामुळे घऱात थोडे वाद-विवाद आहेत. इतर लोकही मला बोलायला लागले, त्यांची इच्छा आहे तर जाऊ द्या. मी माघार घेतली, म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. नंतर दुसरी राज्यसभा झाली, म्हटलं आता जातो. तर म्हणाले नितीन पाटील यांना मी शब्द दिला आहे. शब्द देण्याची ही कोणती पद्धत आहे. जिथे जिल्हा परिषदेचे सदस्य ठरवतानाही एकत्र बसून निर्णय घेतो तिथे खासदाराचा निर्णय एकटे जाहीर कऱणार. ही पद्धत बरोबर नाही", असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
"निवडून दिल्यावर त्यांनी निरोप पाठवला की, साहेबांना सांगा तुम्ही राजीनामा द्या आणि नितीन पाटलांनी राजीनामा द्या सांगूयात. साहेबांना राज्यसभेवर जायचं आहे ना, जाऊ दे. इकडे समीर भुजबळांनी आपण उभे करु. मला समीर म्हणाला असं सांगत आहेत. मी प्रफुल्ल पटेलांना विचारलं तर त्यांनी अजित पवारांशी बोलायला सांगितलं. मी त्यांना म्हटलं, परिस्थिती तिथली आधीसारखी चांगली नाही. ती शांत होण्यास वेळ लागेल. मला शक्य नाही, मी दोन वर्षं मंत्रिमंडळात राहतो. दोन-तीन वर्षात नितीन पाटलांची टर्म संपेल आणि जाईन तिकेड मग इथे कोणाला उभं करायचं पाहू या. यावर चर्चा करु म्हणाले. मला वाटलं चर्चा करतील. पण तशी काही झालं नाही. मला वाटलं त्यांनी विचार सोडला असेल आणि मंत्रिपदाची शपथ होईल. मी त्या तयारीने नागपूरला गेलो होते. बघतो तर माझं नवाच आलं नाही. माझे समर्थकही येऊन बसले होते. ही पद्धत नाही," अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
"ज्या माणसाने राष्ट्रवादी निर्माण झाली तेव्हा शरद पवारांच्या पाठीशी नेता म्हणून मीच उभा राहिले होतो. बाकी उपचार कऱण्यासाठी केरळला, कोण मतदारसंघात काँग्रेसमध्ये राहायचं की जायचं याचं मतदान घेत होतं. मी मात्र शरद पवारांसोबत राहणार असं ठरवलं होतं. मला काँग्रेस सोडू नका, तुम्हाला मुख्यमत्री जाहीर करतो असं सांगितलं होतं. मी त्यांना शरद पवारांचा हात धरुन शिवसेना सोडून आलो आहे सांगत नकार दिला होता. इतकं सगळं माहित असतानाही कचऱ्यासारखं बाजूला करणं हे मनाला दुख देणारं आहे. एखाद्या पदापेक्षा जी वागणूक मिळाली ती वेगळ्या प्रकारची आहे. त्याबद्दल दुख आहे. आम्ही शेवटपर्यंत तुमच्या नावाची शिफारस करत होतो असं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. फडणवीसांनी शेवटपर्यंत तुमच्या नावाच आग्रह धरला असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. पण त्यांनी काही ऐकलं नाही," असा खुलसा छगन भुजबळ यांनी केला.