नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी अनेक स्तरांवर तयारी सुरू केली आहे. यानुसार बलोच नेता ब्रम्हदाग बुगती यांना शरण देण्याच्या प्रक्रियेला भारताकडून वेग देण्यात आला आहे.
भारतीय ओळख पत्र आणि ट्रॅव्हल डॉक्युमेंट्ससाठी बुगती याचा अर्ज गृह मंत्रालयाकडे पोहचला आहे. मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बुगती याच्या अर्जाला मंजुरी देण्यापूर्वी त्याच्या कागदपत्रांची पडताळ करण्यात येईल. यासाठी गुप्तचर संघटनांची मदत घेण्यात येणार आहे. हा एक उच्चस्तरीय राजनैतिक निर्णय आहे. पण आम्हांला संपूर्ण कागदोपत्रांची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
बुगतीने जिनेवाच्या भारतीय वाणिज्य दुतावासात राजकीय शरणासाठी अर्ज केला आहे. हा अर्ज परराष्ट्र मंत्रालयाला फॉरवर्ड करण्यात आला आहे. आता परराष्ट्र मंत्रालयाने या अर्जाला गृहमंत्रालयाकडे पाठविला आहे.
भारताची काही विस्तृत आश्रय निती नाही. युनायटेड नेशन्सनुसार कमीत कमी ६४८० लोकांना भारतात शरण हवे आहेत. पण भारताने त्यांचा स्वीकार केलेला नाही.